अभिनेते शरद पोंक्षे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०६ ऑक्टोबर २०२२


शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाचा दसरा मेळावा बुधवारी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्दयांवरुन टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी अनेक कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली होती यावेळी अभिनेते शरद पोंक्षे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या भाषणापूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शरद पोंक्षेंनी भाषण करतेवेळी रामायण आणि महाभारतात काही दाखलेही दिले. रामायणात रावणाचा भाऊ बिभीषणाने भगवान श्री राम यांच्या बाजूने युद्ध लढले होते. श्रीरामाने बिभीषणाला आपल्या बाजूने लढायचे निमंत्रण दिले नव्हते. पण, बिभीषणाला माहित होते की, आपल्याला सत्याची, धर्माचीच साथ द्यावी लागणार आहे आणि रावण अधर्माच्या बाजूने आहे. म्हणूनच, तो रावणाविरोधात आणि श्रीरामांच्या बरोबरीने लढला. पण, त्याचा कधीच कोणी गद्दार म्हणून उल्लेख केला नाही. महाभारतातही कर्णाला हरवणे अशक्य होते. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला निशस्त्र कर्णावर बाण मारण्यास सांगितले. पण, त्यालाही कोणी पाठीत खंजीर खुपसले असे म्हटले नाही. असे शरद पोंक्षे म्हणाले.

आज एकनाथ शिंदे हे श्रीकृष्णाची भूमिका बजावत आहेत. ज्या बाळासाहेबांनी म्हटले होते, माझा मुख्यमंत्री झाल्यावर मशिदीवरचे भोंगे खाली उतरवेन, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करेन, त्यांच्या मुलाने काय केले, सतत आमच्या देवांचा अपमान करणाऱ्या नेत्यांसोबत बसले. एकनाथ शिंदेंनी उचलले पाऊल किती योग्य होते, ते या मैदानावर आलेला जनसागर पाहून समजतं. सत्य आणि नितीमत्तेसाठी जे जे योग्य आहे ते एकनाथ शिंदे करत आहेत, असेही शरद पोंक्षे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *