तर माझी मुलगी वाचली असती; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा वसई पोलिसांवर आरोप

०९ डिसेंबर २०२२


पालघर येथील रहिवासी असणाऱ्या २७ वर्षीय श्रद्धा वालकरची तिचा प्रियकर अफताब पूनावाला याने दिल्लीत तिचा निर्घृण खून केला आहे. नराधम आरोपीनं श्रद्धाचे मृतदेहाचे ३५ तुकडे करून विविध परिसरात फेकले आहेत. खूनाच्या या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अफताब पूनावाला यांस अटक केली असून तो सध्या तिहार तुरुंगात आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या घटनाक्रमानंतर मृत श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेऊन वसई येथील तुळींज आणि माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांवर आरोप केले आहेत.

आरोप करताना विकास वालकर म्हणाले, अगदी सुरुवातीला वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन व माणिकपूर पोलीस स्टेशन यांच्या असहकार्यामुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबाबत चौकशी व्हावी. कारण त्यांनी सहकार्य केलं असतं, तर माझी मुलगी आज जिवंत असती. काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती. माझ्या मुलीला न्याय मिळावा, यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य लाभलं आहे. माझा न्यायव्यवस्थेनर संपूर्ण विश्वास आहे.

आफताब पूनावालानं माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेनं हत्या केली असून त्याला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याच्या कुटुंबातील आई-वडील व भाऊ यांचीही चौकशी होऊन त्यांना जास्तीत-जास्त शिक्षा झाली पाहिजे, तसंच या कटात इतर कोणी सामील असतील तर त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी वालकर यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *