शाडूच्याच आणि पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचे कारागीर व मुर्तीकारांना आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांचे आवाहन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०७ जून २०२२

पिंपरी


गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी  पर्यावरणपूरक शाडू मातीच्या, नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्तीची निर्मिती करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.महापालिका पर्यावरण पूरक उत्सव साजरे करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते, केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपी मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तिकार आणि उत्पादक यांना पीओपी पासून मूर्ती बनविण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आयुक्त पाटील म्हणाले, मूर्तीकारांनी  केवळ पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्तीची निर्मिती करावी. तसेच त्यांनी केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार  महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मूर्ती बनविणे अथवा विक्री करणे यासाठी महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केलेल्या कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादक यांना महापालिका कार्यक्षेत्रात मूर्ती विक्री स्टॉलला परवानगी मिळणार नाही. त्याचबरोबर विनापरवाना अनधिकृतपणे मूर्ती विक्री करणाऱ्या दुकानदार, व्यावसायिकांवर महापालिकेमार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई करण्यात  येणार असल्याचे सांगितले.

मुर्ती तयार करणाऱ्या अथवा विक्री करणाऱ्या कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादकांनी याबाबतच्या परवानगीसाठी महापालिकेच्या  क्षेत्रीय कार्यालयांकडे संपर्क साधून परवानगी घ्यावी. परवान्याची  एक प्रत दुकानाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. तसेच महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा करताना केवळ शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्तींचा व  पर्यावरणपूरक पूजा साहित्याचा वापर करावा असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *