राजकारणापलीकडे जाऊन, माणुसकी जपणारा मृदू मनाचा दिलदार नेता

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१८ एप्रिल २०२२ 

पिंपरी


पिंपरी चिंचवड शहरातील उमदे नेतृत्व दिलेला शब्द परत न फिरवणारे, कार्यकर्त्याला ताकद देणारे, स्पष्टवक्ते आणि लढवय्ये नेते अशी ओळख असणारे या शहराचे नेते भाजप चिंचवड चे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप सध्या खाजगी रुग्णालयात मृत्यूशी निकराने लढत आहेत. त्यांची प्रकृती ढासाळलेली असली तरी सुधारत असल्याचे डॉक्टर सांगतात. बाहेर उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. भाऊ हे लढणारे नेतृत्व आहे अखेरच्या क्षणापर्यंत लढतच राहणार यात तिळमात्र शंका नाही.

सुरवातीच्या काळात जेव्हा पिंपरी चिंचवडचे दिवंगत महापौर मधुकरराव पवळे यांचे पदावर असतानाच निधन झाले त्यांच्यानंतर शहराचे नेतृत्व करण्याची संधी शरद पवार साहेब आणि अजितदादा यांच्यामुळे मिळाली त्यानंतर भाऊंनी मागे वळून पहिलेच नाही. पण हल्लीच्या राजकारणात वेगळे वारे वाहू लागल्याने त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागले आणि आज भाऊ भाजपमध्ये आहेत.

सडेतोड आणि बेधडक निर्णय घेणारे कणखर नेतृत्व, प्रशासनावर उत्तम पकड असणारे नेतृत्व म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता, वेळेला कठोर पण नागरिकांच्या जिवाभावाचे प्रश्न असतील तर बेधडक निर्णय घेणारा कडक व शिस्तीचा नेता अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे पुढे पुढे करणारे कार्यकर्ते त्यांच्या पुढ्यात जायला कचरतात. पण तेव्हडेच मृदू स्वभावाचे व माणुसकी जपणारे नेते अशीही त्यांची वेगळी ओळख आहे त्याची प्रचिती काल पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना पुन्हा एकदा आली.

काल शनिवारी पिंपरी चिंचवड मध्ये विविध लोकोपयोगी कामाच्या कार्यक्रमांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार होते पण त्यांना जसे समजले की आपले जुने सहकारी लक्ष्मणराव जगताप यांनी प्रकृती खालावली असून ते खाजगी रुग्णालयात मृत्यूशी लढत आहेत. तसे त्यांनी तडक निर्णय घेत सगळे कार्यक्रम रद्द करून भाऊ ज्या खाजगी रुग्णालयात आहेत तेथे जाऊन त्यांचे बंधू विजय जगताप यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करून छोटे बंधू शंकर जगताप यांच्याशी संपर्क साधला आणि काही गरज लागली तर कळवा असा निरोप देऊन जगताप बंधूंना धीर दिला.आपले विधानसभा सदनातील सहकारी आजारी असल्याने शहरात नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची सूचना महापालिका प्रशासन आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना दिले. राजकारणात खऱ्या अर्थाने रिस्पेक्ट काय असतो हे गाजावाजा न करता दाखवून दिले आणि पुढे निघून गेले. तर दुसरीकडे ज्या कार्यकर्त्याला भाऊंनी सुरवातीच्या काळापासूनच भक्कम साथ आणि राजकारणात उभारी दिली त्या कार्यकत्याने कार्यक्रम रद्द न करता चिन्मय मांडलेकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात घेतला. आपल्याच पक्षाच्या एका स्थानिक आमदाराच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी काळजी करण्यापेक्षा स्थानिक व वरिष्ठ भाजप नेत्याना कार्यक्रम जास्त महत्त्वाचा वाटला. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवून देणाऱ्या आमदारापेक्षा त्या कार्यक्रमाला महत्त्व दिले हे माणुसकीला अशोभनीय होते अशी चर्चा शहरात सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची संवेदनशीलता पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना जास्त प्राकर्षाने जाणवणारी ठरते. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रयत्नाने या शहरात भाजपची सत्ता आली हे सर्वज्ञात आहे. तरीही आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून केव्हातरी काम केलेला कार्यकर्ता जो आज गंभीर आजाराशी लढतोय हे समजल्यावर कार्यक्रम करणे हे अजितदादांना गैर वाटले आणि त्यांनी एका क्षणात सगळे कार्यक्रम रद्द करत राजकीय जोडे बाजूला ठेऊन माणुसकीचे दर्शन घडवले. मात्र भाजपने पूर्वनियोजित असलेला कार्यक्रम राबविण्यापुढे कसलीच तमा न बाळगता कार्यक्रम पूर्ण केला. त्या कार्यक्रमाला हजर असलेले भाजपचे राज्य प्रवक्ते आशिष शेलार यांनी कार्यक्रम रद्द करणे सोडाच, लक्ष्मणभाऊ जगताप यांची साधी भेट घेणेही नाकारले. म्हणजेच उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी प्रवृत्ती समोर आल्याने मग आता कुठे गेला ” पॉलिटिक्स विथ रिपेक्ट ” या विषयीची चर्चा शहरात सुरू आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *