देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा यापुढे महाराष्ट्रभरात चालणार : आमदार महेश लांडगे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
दि ११ जून २०२२

पिंपरी प्रतिनिधी


राज्यसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर व्यक्त केला विश्वास

राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी विरोधकांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेरच्या टप्प्यात निवडणूक जिंकली. फडणवीस यांचा हा करिष्मा यापुढील काळात महाराष्ट्रभर चालणार आहे, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

विधान परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजयाची पुनरावृत्ती होणार

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केले.  निवडणूक काळात मतदानाच्या दोन दिवस आधीच आमदार लांडगे मुंबईत दाखल झाले होते.
आमदार लांडगे म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीचे अचूक नियोजन केले. मतदानापूर्वीच फडणवीस चमत्कार करणार हे निश्चित होते. वास्तविक, संख्याबळ नसतानाही फडणवीस यांनी सहावी जागा लढवण्याची जोखीम पत्करली आणि ती यशस्वी करुन दाखवली. विधान सभेतील अन्य पक्षांतील आमदारांचाही फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, ही बाब आता अधोरेखित झाली आहे. राज्यसभेतील विजयाचा हा सिलसिला विधान परिषद आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे दिसणार आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

आमदार जगताप यांची पक्षनिष्ठा प्रेरणादायी…

पिंपरी-चिंचवडचे लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून तीन तासांचा प्रवास करीत मतदानासाठी विधान भवनात दाखल झाले. माझ्यासारख्या भाजपा कार्यकर्त्यासाठी ही प्रेरणादायी बाब आहे. त्याचबरोबर पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही आजारपणात पक्षाशी असलेली बांधिलकी कृतीतून दाखवून दिली. ‘‘राष्ट्र प्रथम..’’या ध्येयाने काम करणारे पक्षाचे सर्व आमदारांसाठी जगताप आणि टिळक यांनी आदर्श घालून दिला, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *