पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेसाठी लघुउद्योग संघटना, व्यापारी असोसिएशनचा पुढाकार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२४ मार्च २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड शहराने स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदविला आहे. महापालिका प्रशासन व क्षेत्रिय कार्यालय निहाय स्वच्छतेबाबत प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. शहरातील पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना व व्यापारी असोसिएशनने देखील स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदविला असून पिंपरी चिंचवडला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

उद्योगांमुळे पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात भोसरी, चिंचवड, ताथवडे या परिसरात छोटे-मोठे औद्योगिक युनिट्स कार्यरत आहेत. याठिकाणी मोठया प्रमाणात कचरा निर्माण होतो. कंपनी व्यवस्थापनाने सांडपाणी व औद्योगिक कच-यांची योग्य विल्हेवाट लावून आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच, व्यापारी वर्गांने देखील आपली दुकाने, गोडाऊन भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यास पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश मोटवाणी यांनी पाठींबा दर्शवून शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. सोशल मिडीयाद्वारे उद्योजक व व्यापारी वर्गाशी संवाद साधून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच, औद्योगिक परिसरात व दुकानांबाहेर कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे.

औद्योगिक परिसरात व दुकानांबाहेर कचरा न टाकण्याचे आवाहन

शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाद्वारे कचरा संकलन व निर्मूलन पध्दत राबविली जात आहे. त्यानुसार, घराघरांतून ओला, सुका, घातक, प्लॅस्टीक अशा पध्दतीने वर्गीकरण करून कचरा गोळा केला जात आहे. चार हजार नागरिकांना कंपोस्ट बिन वाटप करण्यात आलेल्या आहेत. सध्या दोनशेहून अधिक मोठया गृहनिर्माण सोसायटया कच-याचे कंपोस्ट करून जिरवत आहेत. सफाई कर्मचारी रस्त्यांची स्वच्छता नियमीतपणे करीत आहेत. महापालिकेच्यावतीने कचराकुंडी मुक्त् प्रभाग संकल्पना राबवली जात आहे. घरोघरचा कचरा संकलीत करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत नेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरांवर आठ ठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. स्वच्छाग्रह संकल्पना राबविली जात आहे.

सर्व क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातून दररोज ओला, सुका, जलपणी, हॉटेल वेस्ट, चिकण वेस्ट, चिकण वेस्ट, सॅनिटरी वेस्ट, डोमेस्टॉक हजरडेस्क असा सरासरी अकराशे टन कचरा संकलीत करून मोशी डेपोपर्यंत पोहोचविला जात आहे. नागरिकांमध्ये सोशल मिडीया, सांस्कृतिक कार्यक्रम, प्लॉगेथॉन, पथनाटय अशा माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सफाई कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली ३६३ वाहनांद्वारे कचरा संकलन केला जात आहे. तसेच, शहरातील स्वच्छतागृहांची नियमीत स्वच्छता राखून दंडात्मक कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यासाठी रोड मार्शल पथक नियुक्त करण्यात आले आहे. शहर स्वच्छतेसाठी नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून देशात पहिल्या तीन शहरांमध्ये पिंपरी चिंचवड क्रमांक नक्कीच येईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *