चक्क मेट्रोत रंगले तीस कवींचे कविसंमेलन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ मार्च २०२२

पिंपरी


“या जादूच्या दिव्यरथातून
सहल करू या शहराची
चला गड्यांनो आज पाहू या
शान आपल्या मेट्रोची”

कवी अनिल दीक्षित यांच्या या गीतासह नव्या नवलाईच्या मेट्रोत चक्क पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे तीस कवींनी विडंबन गीत, अभंग, वात्रटिका, प्रबोधन अशा विविध आशयाच्या अन् विषयाच्या कवितांचे रविवार दिनांक १३ मार्च २०२२ रोजी सादरीकरण करून मेट्रोचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘साहित्यिकांची मेट्रो सफर’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांत महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, अशोक गोरे, नितीन हिरवे, राजेंद्र पगारे, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. तेरा वर्षे वयाचा विद्यार्थी प्रितेश पोरे ते ऐक्याऐंशी वर्षांच्या ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांच्या सहभागाने खऱ्या अर्थाने चार पिढ्यांचे प्रतिनिधित्व या कार्यक्रमाला लाभले. फुगेवाडी – पिंपरी – फुगेवाडी या मेट्रो प्रवासाचा प्रारंभ संत तुकाराममहाराज यांच्या वेषभूषेतील प्रकाश घोरपडे यांच्या अभंगगायनाने झाला; तर “मेट्रोतून प्रवास करू या!” , “इंधन वाचवू या!” , “प्रदूषण रोखू या!” अशा सचित्र घोषणा आपल्या अंगावर मिरवत अण्णा जोगदंड यांनी प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी महाराष्ट्र पातळीवर प्रतिष्ठेचा मानला जाणारा कामगार कल्याण मंडळाचा ‘कामगारभूषण’ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राजेंद्र वाघ यांना संत तुकाराम रूपातील प्रकाश घोरपडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

“चाल मोरावाणी |
डौल राणीवाणी |
मनाच्या कोंदणी |
मेट्रोराणी ||”

अशा शब्दांत आपल्या अभंगातून वर्षा बालगोपाल यांनी मेट्रोला राणीची उपमा दिली; तर

“आली आली पुणे मेट्रो निघाली
झुकझुक नाही, धूर नाही भाली
पळे पाण्यात, सरपटे जशी होडी
नववधू जणू सासरी निघाली”

या कवितेच्या माध्यमातून डॉ. पी.एस. आगरवाल यांनी तिला नववधू म्हणून संबोधले. हेमंत जोशी, शोभा जोशी, सविता इंगळे, विकास अतकरी, फुलवती जगताप, तानाजी एकोंडे, सुप्रिया लिमये, शिवाजीराव शिर्के, आत्माराम हारे, नंदकुमार कांबळे, प्रदीप गांधलीकर, संगीता झिंजुरके, मीना शिंदे, शामराव सरकाळे, कैलास भैरट, निशिकांत गुमास्ते, विवेक कुलकर्णी, प्रशांत पोरे, आनंद मुळुक, रघुनाथ पाटील यांच्या कवितांमधून मेट्रोविषयी मनोरंजक माहिती उलगडत गेली. कार्यक्रमाच्या संयोजनात अण्णा गुरव, मुरलीधर दळवी, जयश्री गुमास्ते, सुप्रिया सोळांकुरे, मधुश्री ओव्हाळ, संगीता जोगदंड, सरोजा एकोंडे, रंजना वाघ यांनी परिश्रम घेतले. शामराव साळुंखे यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *