शिरूरचे आमदार व अन्य लोकांना निनावी पत्राद्वारे मारून टाकण्याची धमकी देणाऱ्यांना शोधा : नाहीतर २४ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण : अविनाश घोगरे, मनसे शहर प्रमुख

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१२ फेब्रुवारी २०२२

शिरूर


दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी काही शिरूर करांना निनावी पत्रे आलेली होती. ही पत्रे अहमदनगर येथून टपालात टाकलेली होती. यात काही राजकीय, सामाजिक व व्यावसायिक लोकांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती. विशेष म्हणजे खुद्द तालुक्याच्या आमदारांना व शिरूर नगर परिषदेचे सभागृहनेते व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारिवाल यांनाही लक्ष केलेले होते. त्यामुळे या धमकीवजा पत्रामुळे सर्वचजण धास्तावून गेलेले होते. त्या धमकीवजा पत्रांचा सर्वच जाणकार व जागृत नागरिकांनी सोशल मीडिया वर चांगलाच खरपूस समाचार घेतलेला होता. या धमकी पत्राचा निषेध संपूर्ण तालुक्यात होत असताना, शिरूर शहरासह तालुक्यातील अन्य शहरांमध्ये व गाव खेड्यांमध्ये निषेध मोर्चे व निषेध सभा घेत, तालुक्याच्या प्रथम नागरिकावर अशा नामर्द पणे केलेल्या भ्याड लेटर बॉम्ब चा खरपूस समाचार सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध संघटना व नागरिकांनी घेतलेला होता.

तसेच, राज्यातही अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या लेटरबॉम्बद्वारे अनेक राजकीय लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या होत्या. त्यावर विधान भावनातही चर्चा होऊन, एस आय टी मार्फत चौकशी करणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले होते. तसेच, या निनावी धमकी प्रकरणापासून आमदार अशोक पवार यांच्यासाठी, पोलीस अंगरक्षकही नेमलेला होता.

परंतु या निनावी पत्र प्रकरणाला आता जवळ जवळ चार महिने होत आले, तरीही ही पत्रे पाठविणाऱ्याचा शोध पोलीस लावू न शकल्याने, मनसेचे शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी, २५ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, यांना मेल द्वारे या प्रकरणाची चौकशी त्वरित करण्याचे स्मरणपत्र दिलेले होते. परंतु त्याला १५ दिवस उलटूनही पोलीस विभागामार्फत अविनाश घोगरे यांना उत्तर न मिळाल्याने, दि २३ फेब्रुवारी पर्यंत जर उत्तर मिळाले नाही तर दि २४ फेब्रुवारी २०२२ पासून शिरूर पोलीस स्टेशन समोर, आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच शिरूर शहरात जर या उपोषणामुळे परिस्थिती बिघडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल. अशा आशयाचे पत्र पुन्हा एकदा त्यांनी दि. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार अशोक पवार यांना दिल्याने शिरूरचे वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

मात्र हे निनावी पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीमुळे, विनाकारण अनेकांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. तर दबक्या आवाजात चर्चा चालू आहे, की हे प्रकरण दाबले जात आहे. परंतु जर या निनावी पत्राचा दोषी खरोखर सापडलाच नाही, तर मात्र लोकांच्या वायफट चर्चांना आणखी उधाण आल्याशिवाय राहणार नाही. कारण आता पुढे काही दिवसांत शिरूर नगर परिषदेची निवडणूक आली आहे. आणि त्या निवडणुकीवेळी या जीवे मारण्याच्या धमकी पत्राची दहशत प्रत्येकाच्या मनात असणार आहे. कारण काही वर्षांपूर्वी नगरसेवक महेंद्र मल्लाव, यांना भर रहदारीच्या रस्त्यात जीवे मारलेले होते. आणि याच हत्येचा दाखला या धमकी पत्रात असल्याने, आरोपी जो पर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत उलट पालट चर्चा घडतच राहणार असल्याचे, जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ग्रहविभाग, अविनाश घोगरे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्याकडे कसे बघते व हे निनावी धमकी पत्र प्रकरण कसे हाताळते ? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *