रोहित खर्गे
विभागीय संपादक
२९ जानेवारी २०२२
पुणे
पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू करण्यात यावेत, तर नववी ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावेत. पुढील आठवड्यात कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व शाळा पूर्णवेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. २९ जानेवारी रोजी पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत विविध विषयांवर उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड संसर्गाचं प्रमाण कमी झालं असल्यानं कोविड विषयक मार्गदर्शक सुचनांचं पालन करून ०१ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश देखील अजित पवार यांनी दिले.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबतचा निर्णय पालकांनी घ्यावा; त्याबाबत तूर्तास सक्ती करू नये. ०१ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होत असल्यानं लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात यावा; लसीकरण झाले नसल्यास विद्यार्थ्यांना लसीकरणाबाबत सूचना देण्यात याव्यात. लसीकरणामुळे मृत्यूच्या प्रमाणात घट होत असल्यानं लसीकरणावर विशेष भर द्यावा. ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण चांगलं आहे तर शहरी भागात कमी आहे. ग्रामीण भागातील शाळांमधून लसीकरणाची सुविधा दिल्यानं हे प्रमाण वाढलं आहे. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या लसीकरण केंद्राद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
लसीकरण वाहनासोबत वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. संस्था चालकांनी शाळेत कोविड नियमांचं पालन होईल आणि पात्र विद्यार्थ्यांचं १०० टक्के लसीकरण होईल, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी शाळेत देखील मास्कचा वापर करतील याकडे विशेष लक्ष द्यावे. अद्यापही कोविडचे संकट असल्यानं नागरिकांनी मास्क वापरणं आणि मार्गदर्शक सुचनांचं पालन करणं आवश्यकच आहे. नागरिकांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी चांगला मास्क वापरावा. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवावी, अशा सूचना अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.