भोसरी :- दि १२ एप्रिल २०२१
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रुग्णांच्या नातेवाईकांची बेड मिळवण्यासाठी होणारी धावपळ मन हेलवणारी आहे. त्याचा प्रत्यय एका फोनवरून आला. तो अनुभव माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या शब्दात मांडला. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पार्थ पवार युवा मंचच्या माध्यमातून मदत करण्याची सादही त्यांनी घातली आहे.
नुकताच एका सकाळी 6 वाजता एक फोन आला. फोनवरून घाबरलेल्या आवाजात समोरची व्यक्ती म्हणाली, साहेब बेड मिळत नाही. काही तरी मार्ग सांगा. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हेच फोन येत आहेत. कोणाला बेड नाही, कोणाला ऑक्सिजन नाही, कुठे व्हेंटिलेटर नाही, ॲम्ब्युलन्स नाही.
काल नगर मधला एक व्हिडिओ पाहिला एकाच अमरधाम मध्ये 42 प्रेतं जळत होती. त्याचा फोटो ही वर्तमान पत्रात प्रकाशित झाला.त्यावर फोटो ग्राफर ची प्रतिक्रिया होती. परत असा फोटो काढण्याची वेळ कधी येऊ नये.
नाशिक मध्ये रेमडीसिव्हयर साठी लोक रस्त्यावर आले. इंजेक्शन मिळत नाहीये. हे सगळं चित्र पाहून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की परिस्थिती गंभीर आहे. लोकसंख्येच्या तुलनेत आपल्याकडे सुविधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत कोरोणाची साखळी तोडणे गरजेचे आहे. लॉकडाऊन करावे तर कित्येकांचे पोट रोजच्या रोजंदारीवर अवलंबून आहे. शासनाला निर्णय घेणे कठीण होत आहे. पण परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर लॉक डाऊन सोडून दुसरा पर्याय असणार नाही. आपल्याला लग्न मोठे करायचे आहे, दहव्याला लोक आली पाहिजेत, वाढदिवस मोठा करायचा, मित्रांना पार्टी द्यायची आहे, विनाकारण घराबाहेर पडायचं आहे. कशी तुटणार साखळी.
मित्रांनो सावध व्हा. जान है तो जहान है. अगदी जवळच्या लोकांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ येत आहे. रोजच्या संपर्कातील कितीतरी लोक चालता बोलता कोरोणाच्या विळख्यात सापडली. कित्येकांना जीव गमवावा लागला. ज्यांना लक्षण आहेत त्यांना टेस्ट करायला भीती वाटते. टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि डॉक्टरांनी घरात विलागिकरणाचा चा सल्ला दिला तरी आम्ही बाहेर फिरतो. जवळच्या लोकांचा जीव धोक्यात घालतो. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घ्या. घाबरु नका पणं काळजी घ्या आपली आणि आपल्या माणसांची.
डॉक्टरांच्या सल्याच तंतोतंत पालन करा, योग्य आहार योग्य व्यायाम करा. गरज नसताना बाहेर फिरू नका.
काहीही गरज वाटली तर बिनधास्त फोन करा मी शक्य होईल ते सर्व सहकार्य करील. यातून आपण सुरक्षित राहणं आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे.