इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पात कोट्यवधीचा भ्रष्टाचार- माजी आमदार विलास लांडे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१३ ऑक्टोबर २०२१

पिंपरी


पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपयांची कामे काढली आहेत. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हात धुवून घ्यायला सुरुवात केली आहे. आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र चरणाला पदस्पर्श करून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपत्रात हे काम करण्यासाठी 200 कोटींचा खर्च केला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या बगलबचांना यात कामाचा ठेका मिळाला आहे. अद्याप एक टक्का सुद्धा काम झालेले नाही तरीदेखील महापालिकेने 47 कोटींचा खर्च काढला आहे. या नदी सुधार प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाला असून देवाच्या आळंदीत सुद्धा सत्ताधा-यांनी पैसे खाण्याचा आपला धंदा सोडला नाही, अशी टीका माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे.

देवाच्या आळंदीत सत्ताधाऱ्यांनी पैसे खाण्याचा मांडला उद्योग

इंद्रायणी आणि पवना नदी सुधार प्रकल्पांतर्गत नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी जलशुद्धीकरण केंद्रात नेण्यासाठी पात्राच्या दोन्ही बाजूवर इंटरसेप्टर लाईन (पाईपलाईन) टाकण्यात येत आहे. पाईपलाईनद्वारे नाल्यातील सांडपाणी जलशुद्धीकरण केंद्रात नेण्यात येणार आहे. त्याठिकाणी त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून याद्वारे प्रदूषण रोखण्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. परंतु, गेल्या साडेचार वर्षात नदी प्रदूषणच नव्हे तर कोणत्याच प्रकारचे प्रदूषण रोखण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही. तरी देखील सत्ताधाऱ्यांनी नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. याद्वारे इंद्रायणी नदीपत्राच्या दोन्ही बाजूला सांडपाणी उचलण्यासाठी 13.90 कि. मी. इंटरसेप्टर लाईन टाकण्यात येत आहे. यावर पहिल्या टप्प्यात तब्बल 47 कोटी 62 लाख 12 हजार 376 एवढा खर्च केला जात आहे. नदीपत्राचे दिमार्केशन करून पत्रातील गाळ काढणे, गॅबियाण पद्धतीची भिंत बंधने, सांडपाणी रोखण्यासाठी आरसीसी पाईपलाईन टाकणे, पंपिंग स्टेशन उभारणे या कामांवर 200 कोटीहून अधिकचा खर्च केला जाणार असल्याचे माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे.

उच्च स्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली तक्रार

हे काम नदी प्रदूषण रोखण्यासाठी काढले नसून सत्ताधाऱ्यांनी आपल्या बगलबच्याना यात सहभागी करून स्वतःचे खिसे भरण्यासाठी काढले आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असून लोकांच्या पैशांवर डल्ला मारला जात आहे. इंद्रायणीच्या तीरावर संत ज्ञानेश्वर माऊलींची पवित्र पादुका ठेवलेली आहे. या पवित्र स्थळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. माऊलींच्या पादुकाला स्पर्श करून वाहणाऱ्या इंद्रायणीच्या तीरावर या प्रकल्पाचे 1 टक्का सुद्धा काम पूर्ण झाले नाही. तरी यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत आहे. या प्रकल्पाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *