पक्षचिन्ह गोठवून काय मिळवले – उद्धव ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२


शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष रविवारी नव्या वळणावर पोहोचला. आता ‘महाशक्ती’चा हेतू साध्य झाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका केली आहे . दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटच जबाबदार असल्याचा आरोप करत आमच्यावरच अन्याय झाल्याचा दावा शिंदे गटाने केला.

पक्षचिन्ह गोठविल्याने तुमच्यामागील महाशक्ती’चा हेतू साध्य झाला. आता तुमचा उपयोग संपल्याने ही मंडळी तुम्हाला केव्हाही फेकून देतील. मग, मराठी अस्मिता, हिंदूत्व जपणाऱ्या शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवून काय मिळवले’’, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. आयोगाचा निर्णय अन्यायकारक आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आयोगाचा हा निर्णय अपेक्षित नव्हता. न्यायालयाने शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविल्यास चिन्ह गोठविल्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल ठाकरे यांनी केला. पण, मी डगमगलो नसून, माझा न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.

मुख्यमंत्री व्हायचे होते, ते साध्य केले. पण, आता शिवसेनाप्रमुख व्हायला निघाले आहेत, हे जरा अती होत आहे. आपला राजकीय जन्म ज्या शिवसेनेमुळे झाला, त्या शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठविण्याचे ४० खोकासुरांच्या रावणाचे हे काम म्हणजे आईच्या काळजात कटय़ार घुसविण्यासारखे आहे. त्यातून त्यांना आणि त्यांच्यामागे असलेल्या ‘महाशक्ती’ला आनंदाच्या उकळय़ा फुटत असतील. चाळीस डोक्यांच्या उलटय़ा काळजाच्या रावणाने प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण गोठवला आहे. जे आम्ही सहजपणे करू शकलो नाही ते तुमचीच माणसे फोडून केल्याचा भाजपला अधिक आनंद झाला असेल, असेही ठाकरे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *