संघ शाखेतून व्यक्तीनिर्माणाचे कार्य :  सुनील कुलकर्णी

पिंपरी चिंचवड संघाचा मकरसंक्रांत उत्सव

पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून व्यक्ती निर्माणाचे पवित्र कार्य गेल्या ९८ वर्षांपासून सुरू असून, जातीविरहित संपूर्ण हिंदू समाज एकत्रित होऊन राष्ट्र सर्वप्रथम हा भाव जागृत व्हावा हा दृष्टीकोन संघ शाखेद्वारे विकसित होतो असे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख सुनीलजी कुलकर्णी यांनी सांगवी येथील पी. डब्लू. डी. मैदानावर आयोजित पिंपरी चिंचवड शहर रा.स्व.संघ मकर संक्रांत उत्सवात केले.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी भारतीय नौसेना सेवानिवृत्त लेफ्टनंट कमांडर भानुदासजी जाधव, संघाचे अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख सुनीलजी कुलकर्णी, पुणे विभाग संघचालक संभाजीराव गणपतराव गवारी, पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोदजी बन्सल प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलतांना कुलकर्णी म्हणाले, आत्मकेंद्री मनुष्य राष्ट्रहिताचा मोठा विचार करू शकत नाही त्यामुळे व्यक्ती समाजाभिमुख होण्याकरिता संघ भाव जागरण करतो. संघ स्वयंसेवक सेवाकार्य, राष्ट्र कार्याच्या पवित्र कार्यात मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत असेही ते म्हणाले..
शाखेतून संतुलित व समर्पित व्यक्तिमत्त्व घडवले जाते.

शाखेच्या कार्यक्रमात सहजता, सर्वसमावेशकता असते त्यात उच्चनीचता, जाती पाती असा भेद कधीच केला जात नाही.सज्जनशक्तीचे जागरण संघ करीत असतो.
ज्या पद्धतीने शरीराचे अवयव एकमेकांची सहाय्यता करतात त्याच पद्धतीने स्वयंसेवक राष्ट्र हितासाठी कायम कटिबध्द असतो,लाखो सेवाकार्य संघ स्वयंसेवक निःस्वार्थ भावनेने चालवीत आहेत. राष्ट्र सर्वप्रथम ही भावना शाखेतील शारीरिक व बौद्धिक कार्यक्रमाद्वारे विकसित होते यालाच व्यक्तिमत्व विकास म्हणतात. संघकार्य समजून घेण्यासाठी केवळ दर्शक न बनता संघात येऊन अनुभूती घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भानुदासजी जाधव यांनी विशाल संघ कार्याचे तसेच विशेषतः घोष दलाचे (बँड पथकाचे) कौतुक करून या कार्यक्रम अवलोकन वेळी आपली महान संस्कृती, पारंपरिक जीवन व शिक्षण पद्धती या सर्वावर प्रकाश टाकला.कार्यक्रमात पूर्ण गणवेशात उपस्थित हजारो स्वयंसेवकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नियुद्ध (कराटे), यष्टी, सामूहिक समता, व्यायामयोग, योगासने,घोष (बँड) चे प्रात्यक्षिके, सामूहिक गीत सादर केले. यावेळी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *