कारेगावातून मोबाइल दुकानातील चोरीला गेलेला माल, मध्यप्रदेशातील भोपाळ मधून चोरट्यांसह हस्तगत करण्यात, रांजणगाव पोलिसांना तात्काळ यश…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
कारेगाव : दि. २२ ऑगस्ट २०२१

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे कारेगाव येथील, ‘श्री समर्थ मोबाईल’ या दुकानात दि. १६/०८/२०२१ रोजी रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून चोरी केलेली होती. या दुकानातून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता. याबाबत दुकानाचे मालक नितीकेश चंद्रकांत मैड यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केलेली होती. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक सुभाष मुंडे हे तपासाला लागलेले होते. त्यांच्या तपास पथकात पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे आणि उमेश कुतवळ हे सहकार्य करत होते. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी जाऊन त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला होता. त्यावेळी सदर गुन्ह्यातील आरोपी चोरलेला मुद्देमाल हा नागपूर येथे विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.


या चोरीत चोरट्यांनी नवीन मोबाईल तसेच दुरुस्तीसाठी आलेले जुने मोबाईल, असे एकुण ४२ मोबाईल, एक लॅपटॉप, १३५ घड्याळे तसेच दुकानातल्या इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, असा एकुण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेलेला होता. गोपनीय माहितीनुसार हा मुद्देमाल घेऊन हे चोरटे नागपूर येथे गेल्याची माहिती मिळाल्याने, पोलीस पथक नागपूर शहरात शोध घेत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की, हे चोरटे चोरलेला मुद्देमाल विकण्यासाठी थेट मध्यप्रदेशला गेलेले आहेत. त्यामुळे पोलीस पथकाने लागलीच मध्यप्रदेश गाठत, भोपाळ शहरातून या सर्व चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे रांजणगाव पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या पथकाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे यांनी केले. तर त्यांना पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे आणि उमेश कुतवळ यांनी सहाय्य केले.
भोपाळ (मध्य प्रदेश) येथून ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –

१) लकेश लोकचंद पटले, वय २३, मूळ रा. गोपालपुर, थाना कटंगी, जि. बालाघाट, (मध्यप्रदेश)
२) रितिक अनिल धमगाये (वय २१) ३) सशांक राजेंद्र सहारे (वय २२) दोघेही राहणार जरीपटका, नागपूर, महाराष्ट्र.
सदर चोरीचा सर्व मुद्देमाल, हा या चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आला आहे. या सर्व आरोपींविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा.दं.वि.क. ३८०, ४६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या सुचनेनुसार, पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस हवालदार राजू मोमीन, सायबरचे सेल चे पोलीस कॉन्स्टेबल कोळी, पोलीस हवालदार सुनील नर्के, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी हि कारवाई केली असून पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुनील नर्के करत आहेत.
रांजणगाव कारेगाव MIDC मध्ये कामानिमित्त अनेक लोक बाहेरगावाहून व परप्रांतामधून आलेले असल्याने, या भागात तात्पुरत्या रहिवाशांची लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे. त्यामुळे अवैध्य व्यवसाय, चोऱ्या, वाटमाऱ्या, फसवणूक व इतरही गोष्टींचा ताण हा पोलीस यंत्रणेवर येतोय. त्यामुळे, पोलिसांनी या भागात सर्च ऑपरेशन व कोंबिंग ऑपरेशन राबविण्याची गरज असून, या भागातील भाडेकरूंची ओळख पटवून घेण्याची गरज आहे.
मात्र, चोरीला गेलेला सर्व माल तात्काळ हस्तगत करण्यात रांजणगाव पोलिसांना यश आल्याने, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *