रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि. २४ जून २०२१ ग्लोबल वॉर्मिंगवर वृक्षारोपण आणि संवर्धन हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी केले.
गुरुवारी (दि. २४ जून) वटपौर्णिमेनिमित्त पिंपरीतील जीजामाता रुग्णालयातील प्रांगणात वड, पिंपळ, चिंच या पारंपरिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी रंजना जाधव, शारदा मुंडे, वैशाली कुदळे, शुभांगी संदिप वाघेरे, पद्माताई म्हेत्रे, संजीवनी रसाळ, उषा रसाळ, शालिनी शिवशरण, कमल वाघचौरे, अपुर्णा कोटाडे, शोभा मिरजकर आदींसह आशा सेविका महिला भगिनी उपस्थित होत्या. उपस्थित महिला, भगिनींना तुळशीचे रोप वाटप करण्यात आले.
यावेळी गिरीजा कुदळे म्हणाल्या की, आधुनिक जीवनशैलीमुळे शहरी भागातील बहुतांशी नागरीकांना आरोग्याचा गंभिर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. यावर देशी पारंपरिक वृक्षांचा फायदा होत असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. याला सांस्कृतिक जोड देऊन आपल्या पुर्वजांनी वटपौर्णिमा सण सुरु केल्याचे दिसते. पारंपरिक देशी वृक्षांमध्ये वडाच्या वृक्षाला खुपच महत्व आहे. वडाच्या फांद्या, पाने, मुळ, साल, खोड, पारंब्या अशा सर्वाचा आयुर्वेदात उपयोग केला जातो.
वटवृक्षाच्या जवळपास ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते असे शास्त्रज्ञ म्हणतात. शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलात अशा वृक्षांची वाणवा आहे. महिलांनीच आता वसुंधरेच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा असेही आवाहन गिरीजा कुदळे यांनी केले.