निगडी स्मशानभूमीत कुत्रे तोडताहेत मृतदेहांचे लचके !

ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ८ जून २०२१
निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये कोरोना बाधित अर्धवट जळालेले मृतदेह काही कुत्री खात असल्याचा घृणास्पद प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.कोरोनाबाधित मृतदेहांवर महापालिकेतर्फे मोफत अंत्यसंस्कार केले जातात.त्यासाठी महापालिकेने एका संस्थेची नेमणूक केली आहे,तरीदेखील असे प्रकार घडत आहेत.त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.


याबाबत आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून कोरोनाबाधित एका मृतदेहामागे आठ हजार रुपये खर्च महापालिका उचलते,तरीही स्मशानभूमीत मृतदेह अर्धवट जळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दि.०२ जून २०२१ रोजी एका अंत्यविधीच्या निमित्ताने निगडी स्मशान भूमीत गेलो होतो. अंत्यविधी उरकल्यानंतर मला त्या ठिकाणी काही कुत्र्यांचा गराडा दिसला. मी त्यांच्या जवळ जाऊन पाहिले असता ते कुत्रे अर्धवट जळालेला कोरोनाबाधित मृतदेहाचा पाय खात होते. या संपूर्ण प्रकाराचे मी व्हिडिओ चित्रीकरण करून ठेवलेले आहे. निकृष्ट दर्जाची लाकडे आणि बहुतांश वेळा लाकडाचा कमी वापर केल्याने योग्य प्रकारे राख होत नसल्याचे आढळले आहे. यातूनच भटकी कुत्री कोरोनाबाधित मृतदेहाचे लचके तोडत आहेत. कुठल्याही प्रेताची अवहेलना होऊ नये, त्याला शेवटचा निरोप सन्मानाने दिला पाहिजे.याउलट कोरोनाने मयत झालेली व्यक्ती स्मशानभूमीतही चिरनिद्रा घेऊ शकत नाही,ही अत्यंत संतापजनक बाब आहे. कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी संस्थेची नेमणूक केली म्हणजे महापालिकेची जबाबदारी संपली काय? त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळया यादीत टाकावे व यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

निगडीच्या अमरधाम स्मशानभुमीचे वृत्त कळताच महापौरांनी दिली स्मशानभूमीस भेट

निगडीतील अमरधाम स्मशानभुमीमधील चाललेला भ्रष्टाचार, मृत्युनंतरही चाललेली मयतांची हेळसांड व कुत्र्याने अर्धवट जळलेल्या मयतांचे लचके तोडतानाची बाब सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी उजेडात आणल्यावर अखेर महापौर, सत्तारूढ पक्षनेते यांनी स्मशानभूमीस भेट देत पाहणी केली. सुरक्षा, आरोग्यविषयक त्रुटी आणि हलगर्जीपणा निदर्शनास आल्याने कारवाई करणेबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनास आदेश दिले आहेत. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, मुख्य आरोग्य निरीक्षक सुधीर वाघमारे, महेश आढाव, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *