शिवसेनेतर्फे पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पनवेल- २९ मे २०२१
शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सहकार्याने आणि मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून पनवेल उपजिल्हा रूग्णालयाला चार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांना, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स मशीनद्वारे घरीच ऑक्‍सिजन उपलब्ध होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड आहेत. सर्व सोयी सुविधा असलेले हॉस्पिटल आहे. कोरोना रुग्णांसह इतर रुग्णावर देखील उपचार येथे केले जातात. खासदार बारणे यांनी रुग्णालयाची पाहणी करत सोई-सुविधांची माहिती घेतली होती. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीची कमतरता जाणवत होती. त्यासाठी खासदार बारणे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून रुग्णालयाला आज (शनिवारी) चार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स देण्यात आले आहेत. यावेळी शिवसेना जेष्ठ सल्लागार बबनदादा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॅा.सचिन संकपाळ, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, युवाधिकारी औचित राऊत, तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, शहरसंघटक प्रविण जाधव,कामोठा शहरप्रमुख राकेश गोवारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, “कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दर्जेदार उपचार झाले. अनेक रुग्ण येथे उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासली. आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. संभाव्य तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू करावे. या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरुन उपाययोजना कराव्यात. औषधे, इंजेक्शनचा पुरेसा साठा करून ठेवावा. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे. अशा रुग्णांना ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी घरी देण्यात यावा. रुग्णांची ऑक्सिजनची मागणी संपल्यावर तो परत जमा करून घ्यावा”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *