आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. २० एप्रिल २०२१ पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या प्रादुर्भावामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढली आहे. असे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी त्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांकडून खासगी रुग्णवाहिकाचालक तासाला १ हजार ते ३ हजार रुपये घेत आहेत. हे म्हणजे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार आहे. मृतांचे कुटुंबिय किंवा नातेवाईक दुःखात असल्यामुळे ते आपली होणारी आर्थिक लूट गपगुमान सहन करत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे यासाठी पिंपरी-चिंचवडमधील सर्व खासगी रुग्णवाहिका त्याब्यात घेऊन त्यांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत संचलन व्हावे. तसेच नागरिकांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरू करावी, अशी सूचना आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तो कमी व्हावा तसेच रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, काही घटक हे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची किंवा नातेवाईकांची आर्थिक लूट करण्यासाठी टपूनच बसले आहेत, असे चित्र आहे. त्यामध्ये प्रामुख्याने खासगी रुग्णवाहिकांचा समावेश आहे. कोरोना रूग्णाला रुग्णालयांमध्ये किंवा विविध डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तसेच मृत कोरोना रुग्णांना स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेची (ॲम्बुलन्स) आवश्यकता सर्वांनाच भासते. त्याचा गैरफायदा घेत शहरातील खासगी रुग्णवाहिकाचालकांनी रुग्ण व त्यांचे कुटुंबिय किंवा नातेवाईकांची लूट चालवली आहे. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्यासारखी स्थिती आहे.

शहरातील खासगी रुग्णवाहिका तासाला १ हजार ते ३ हजार रुपये दर आकारत आहेत. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावले जात असून मृत्यूमुखी पावलेले मृतदेह महापालिकेने नेमून दिलेल्या स्मशानभूमीत दहन केले जाते. मृतदेह रुग्णवाहिकेतून नेलेला असतो. तेथे मृतदेहाचे दहन करण्यासाठी चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागते. त्यानुसार मृताचे कुटुंबिय रुग्णवाहिकेला तासाला १ हजार रुपये याप्रमाणे ४ ते ५ हजार रुपये, तर ३ हजार रुपये याप्रमाणे १२ ते १५ हजार रुपये मोजत आहेत. जनतेची होणारी ही लूट म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही ही त्याहून गंभीर बाब आहे.

खासगी रुग्णवाहिकांकडून कोरोना रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात होणारी ही आर्थिक लूट कुठे तरी थांबणे गरजेचे आहे. शहरातील खासदार, आमदार यांच्यामार्फत देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे संचलन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत केले जाते. त्याच धर्तीवर शहरातील सर्व खासगी रूग्णवाहिका उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तातडीने ताब्यात घ्यावेत. या खासगी रुग्णवाहिकांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्याच्या आधारे या रुग्णवाहिकांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्वतः संचलन करावे. त्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. नागरिकांना या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक तातडीने उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून कोरोना रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणे किंवा इतर तपासण्याकरिता विविध लॅबरोटरी किंवा डायग्नोस्टीक सेंटरकडे घेऊन जाण्यासाठी मोठा दिलासा मिळेल, अशी सूचना त्यांनी केली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *