मानवतेसाठी धावून आले संत निरंकारी मिशन…नानगाव (दौंड) मध्ये ५० बेडचे कोविड सेंटर सुरू

दौंड (पुणे), २१ एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत कित्येक रुग्णांना रुग्णालय उपलब्ध होत नाहीत ही परिस्थिती लक्षात घेऊन निरंकारी ‘सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज’ यांच्या आशीर्वादाने नानगाव येथील संत निरंकारी सत्संग भवन शासनाला कोविड सेंटर बनविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या ५० बेडची सुविधा करण्यात आली आहे.

या कोविड सेंटरचे उदघाटन आमदार राहुल कुल (दौंड विधानसभा) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. आमदार कुल म्हणाले की, आज कोरोनासमोर गरीब-श्रीमंत सर्व समान आहेत. पुण्यात लोकांना रुग्णालय उपलब्ध होत नाहीत या परिस्थितीत निरंकारी मिशन पुढे येऊन आपले सत्संग भवन कोविड सेंटर साठी उपलब्ध करून देत आहे ही गोष्ट गौरवास्पद आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख विकास खळदकर यांनी सांगितले की, या कोविड सेंटर मुळे परिसरातील ८ ते १० गावांना फायदा होणार आहे.

पुण्यातील संत निरंकारी मिशनची सर्व सत्संग भवन गरजेनुसार कोविड सेंटर साठी शासनाला उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मिशनचे पुणे जिल्हा प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली. शेवटी स्थानिक विभागप्रमुख श्री विलास रासकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार आणि प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले.