रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी: दि २५ मार्च २०२१
निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये मृत कावळे आढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात त्यांनी म्हटले आहे की,अमरधाम स्मशानभूमीमध्ये शहरातील अनेक ठिकाणांहून अंत्यविधीसाठी नागरिक येत असतात. या ठिकाणी आठ ते दहा दिवसांपासून अनेक कावळे मृत्यूमुखी पडत आहेत, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तसेच या स्मशानभूमीत अनेक कर्मचारी कामास आहेत. रोजच अशा प्रकारे कावळ्यांच्या होणाऱ्या मृत्यूमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मृत कावळ्यांच्या संपर्कात आल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांचा व तेथील कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सदर मृतावस्थेत आढळलेल्या कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत व तपासणी करून कावळ्यांच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट करावे तसेच वस्तूनिष्ठ माहिती द्यावी, सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.