अल्पवयीन मुलींना फुस लावुन पळवुन नेणा-या ४ आरोपींवर गुन्हा दाखल

चारही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

नारायणगाव दि १९ (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) – नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून फूस लावुन पळवून नेणा-या ४ आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली .

दरम्यान या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी शुभम प्रकाश गाडेकर (वय २१) ,प्रकाश विठोबा गाडेकर (वय ५६), रोहिदास विठोबा गाडेकर (५०) सर्व राहणार माळवाडी, खोडद ता.जुन्नर व प्रविण लक्ष्मण वाघ (वय १८ राहणार ओझररोड ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार दि १६ नोव्हेंबरला रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास खोडद गडाचीवाडी येथील दोन अल्पवयीन मुली या घरी काहिही न सांगता अचानक निघुन गेल्या होत्या. या मुली अल्पवयीन असल्याने गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी नारायणगाव पोलिसांना पिडीत मुलींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी या गुन्हयाचा तपास सुरु केला असताना या गुन्हयातील अल्पवयीन मुलींना शुभम गाडेकर ,प्रकाश गाडेकर व रोहिदास गाडेकर यांनी संगणमताने फूस लावून नाशिक येथे पाठवुन दिल्याचे निष्पन्न झाले. या तिघांनी अल्पवयीन मुलींना नाशिक येथे एस.टी.बस ने पाठविले होते. परंतु त्यानंतर या मुलींचा मोबाईल बंद झाल्या मुळे त्यांचा शोध घेणे अवघड झाले होते. त्यामुळे या मुली कोठे गेल्या याविषयी काहिही माहिती प्राप्त होत नव्हती.

मात्र तांत्रिक माहितीवरून या मुली पालघर जिल्ह्यातील मोखाडा या  ठिकाणी निर्जन ठिकाणी असल्याचे समजताच नारायणगावचे पोलीस हवालदार एस एम टाव्हरे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल भेके, पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे यांच्या पथकाने अवघ्या ४८ तासांच्या आत पालघर येथील जंगल परिसरातुन दुर्गम भागात जावुन अतिशय मेहनतीने पिडीत मुलींचा शोध घेतला. या मुलींसह पालघर येथे अल्पवयीन मुलींना फूस लावून बोलावून घेणारा प्रविण वाघ याला अटक करण्यात आलेली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक  डॉ.अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील , उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड,पोलीस हवालदार टाव्हरे,पोलीस नाईक दिनेश साबळे, अतुल भेके,सचिन कोबल,प्रवीण लोहोटे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक राजु मोमीन यांनी केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *