पिंपरी,दि २४ फेब्रुवारी २०२१
गेली ३२ वर्षे मानधनावर असलेल्या शहरातील २१० बालवाडी शिक्षिकांच्या प्रश्नात उपमहापौर केशव घोळवे यांनी आता लक्ष घातले आहे. बालवाडी हा विद्यार्थ्यांचा पाया असून तो भक्कम करणाऱ्या तेथील शिक्षिकांना पालिका सेवेत घेण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आज (ता.२४) केली.
आर्थिक शोषण होत असलेल्या शहराच्या स्मशानभूमीतील कंत्राटी कामगारांना उपमहापौरांनी याअगोदरचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून न्याय मिळवून दिला आहे. कामगार नेता असलेल्या उपमहापौरांनी नवीन आयुक्त पाटील येताच त्यांच्यापुढे बालवाडी शिक्षिकांचा प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. पालिकेच्या २१० बालवाडी १९८८ पासून सुरु आहेत. त्यातील काही बालवाडी शिक्षिका १९८८ पासुन मानधनावर काम करीत आहेत. खाजगी बालवाडीची फी न परवडणारी झोपडपट्टीतील गरीब मुले पालिका बालवाडीत आहेत.तेथे त्यांचा पाया भक्कम झाला,तरच ती पुढे उंच भरारी घेऊ शकणार आहेत. त्यामुळे तेथे त्यांच्या पंखात बळ भरणाऱ्या शिक्षिकांनाही ताकद देणे गरजेचे असल्याने त्यांना मानधनावरून पालिका सेवेत घेण्याची मागणी घोळवे यांनी केली आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा आकृतीबंध तयार करून बालवाडी शिक्षिकांची कायम वेतनश्रेणीतील पदे नियमित करता येतील.त्यामुळे त्यांना शिक्षिकांना मनपा कायम सेवेत घेणे शक्य होईल,या मजकुरवजा मागणीचे लेखी निवेदन घोळवे यांनी आय़ुक्तांना दिले आहे.