नारायणगांव (किरण वाजगे)
बनावट नोटा देवून पैसे दुप्पट करणारी टोळी नारायणगांव पोलिसांनी एल सी बी च्या सहाय्याने नुकतीच जेरबंद केली.
याबाबत नोटा डबल करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून बनावट नोटा दिल्याची फिर्याद बाळू कारभारी पवार यांनी नारायणगांव पोलीसांकडे दिली.
या बाबत नारायणगांव पोलीसांकडून समजलेली हकिगत अशी की, बाळासाहेब दाते याचा फिर्यादी बाळू कारभारी पवार यास फोन येत होता. नोटा डबल करून देतो” असे दाते फोनवर सांगत होता.मात्र त्यास नकार देऊनही वारंवार फोन येत असल्याने मंगळवार ता. १ सप्टेंबर रोजी पुन्हा फिर्यादी पवार यास फोन आला की, चौदा नंबर येथील समर्थ वडापाव सेंटर जवळ या. दुपारी दोनच्या सुमारास बाळासाहेब बापू दाते, प्रमोद भगवान साळवे (रा, कासारी,ता. पारनेर,जिल्हा अहमदनगर) समीर दशरथ वाघ (रा. गुर्वेवाडी,ता. पारनेर,जिल्हा अहमदनगर) आणि अमोल बन्सी भोसले (रा. भोसलेवाडी पेमदरा ता. जुन्नर जिल्हा पुणे) यांनी पल्सर मोटरसाइकल नंबर एमएच १४/जी.क्यू/५८४१ वरून येऊन नोटा डबल करून देतो , असे सांगून फिर्यादी पवार यांच्याकडून पंचवीस हजार रुपये घेऊन त्यांना पन्नास हजार रूपयांचा बंडल दिला. बंडलच्या खालच्या व वरच्या बाजूला एक एक खरी नोट लावल्याचे फिर्यादी पवार यांच्या लक्षात आले नाही. ९८ नोटा बनावट देऊन फिर्यादीची ४९ हजाराची फसवणूक वरील भामट्यांनी केली.
या घटनेनुसार नारायणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २९४/२०२०,भारतीय दंड कलम ४२०,३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
नारायणगांव पोलीस ठाण्यात बनावट नोटा देऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला अशी माहिती एल.सी.बी. तथा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. या विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना समजताच त्यांनी लागलीच आपल्या सहकाऱ्यांना माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेतील रवींद्र मांजरे, सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय जगताप, हवालदार शंकर जम,शरद बांबळे, रौफ इनामदार, पोलीस नाईक चंद्रकांत जाधव, दीपक साबळे, काशीनाथ राजापुरे यांना गुह्यातील आरोपी ताब्यात घेण्यासाठी मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या. त्यानुसार नारायणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्यासह पोलीस नाईक बी.वाय.लोंढे, पो.कॉ. वाय. डी. गारगोटे आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी सूचने प्रमाणे गुन्हेगारांना शोधन्यासाठी रवाना झाले. पोलिसांनी पाटलाग करून शिताफिने गुन्हयातील मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटार-सायकल जप्त करून आरोपींना अटक केली. त्यांच्या विरुद्ध नारायणगांव, जुन्नर, खेड या पोलीस ठाण्यात खून, दरोडा आणि चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी बन्सी भोसले या आरोपी विरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २९५/२०२० भारतीय दंड विधान कलम ३५४,३५४(ड), ५०६,पोस्का कलम ८,१२ या प्रामाणे गुह्या दाखल असून, तेव्हापासुन हा आरोपी फरार होता.
पुढील तपास नारायणगांव पोलीस करीत आहेत.