महाविकास आघाडी सरकारकडून भाजपला बदनाम करण्याचा डाव : सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी : दि २८ ऑगस्ट २०२१
पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजप नेतृत्वाखाली महापालिकेच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये मोठया प्रमाणात विकासकामे झाली. आगामी काळात अनेक मोठे प्रकल्प देखिल मार्गी लागणार आहे. विकासकामांच्या माध्यमातून शहरातील भाजपाची वाढत चाललेली ताकद व केलेली विकासकामे पाहुन अल्पावधितच येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीत आपली सत्ता येणार नाही हे महाविकास आघाडीला कळून चुकल्याने त्यांच्या पायाखालची माती सरकली आहे. त्यामुळे काहीना काही कुरापत्या करून भाजपला बदनाम करण्याचा डाव महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, नुकतेच भाजपाचे केंद्रीय मंत्री राणे साहेबांच्या अटके संदर्भात राज्याचे कॅबिनट मंत्री असलेले अनिल परब यांची पोलिस यंत्रणेसोबतची फोनवर झालेल्या संभाषणाची क्लीप जनतेपुढे व्हायरल झालेली आहे. या क्लीपमधील संभाषणावरुन महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांकडुन सत्तेचा गैरवापर कसा केला गेला हे जनतेसमोर स्पष्ट झालेले आहे. आणि त्याचाच प्रत्यय पिंपरी चिंचवडमध्येही बघायला मिळत आहे. राज्यामध्ये असलेल्या सत्तेच्या जोरावर महाविकास आघाडीतील ही मंडळी कुट कारस्थाने रचून पिंपरी चिंचवड शहर भाजपाला बदनाम करण्याचा डाव आखत आहेत. हे अत्यंत निंदनीय व खालच्या पातळीचे राजकारण असल्याचेही ढाके यावेळी म्हणाले.

पिंपरी चिंचवड भाजपाने केलेल्या विकासकामांसमोर स्वबळावर ५० नगरसेवक निवडून आणून सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या शिवसेनेच्या नेतेमंडळींना येणाऱ्या निवडणूकीत आपला स्पष्ट पराभव डोळयासमोर दिसु लागला आहे. तर शहरातील जनतेला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादीकडे कोणताही मुददा नाही. म्हणूनच ते राज्यामध्ये सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन कुटील कुट-कारस्थाने करण्यात मग्न झालेले आहेत. खरंतर लाचलुचपत विभागामार्फत सुरु असलेली कारवाई हा एक चौकशीचा भाग आहे. यामध्ये कसलाही भ्रष्टाचार झालेला नाही आणि होणारही नाही हेच सिध्द होणार आहे, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचेही ढाके यांनी यावेळी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *