खेड घाटाच्या बाह्यवळण रस्त्याचे काम आले पूर्णत्वास

काही दिवसांतच होणार खेड घाटातील बाह्यवळण रस्ता सुरू

खेड (किरण वाजगे – कार्यकारी संपादक)

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत होत असलेल्या सिन्नर ते खेड या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामांना आता गती प्राप्त होत आहे.

चौपदरीकरण कामाच्या अंतर्गत खेड घाटाच्या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्णत्वास आले असून नवीन खेड घाटातील हा बाह्यवळण रस्ता येत्या काही दिवसातच सुरू होत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी हा बाह्यवळण रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याशिवाय संपूर्ण घाट रस्त्यावर पायी जाऊन या रस्त्याचे काम कशा पद्धतीने चालू आहे हे देखील खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पाहिले आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी देखील हा नवीन घाट रस्ता लवकरात लवकर सुरू करावा यासाठी प्रयत्न केला आहे. मात्र यापुढे आजी व माजी खासदार समर्थकांमध्ये आमच्यामुळेच हा रस्ता पूर्ण झाला असा श्रेयवाद रंगणार हे मात्र नक्की.

पुणे बाजूकडून खेड घाट चढून आल्यानंतर नाशिक बाजूकडे जाणारा हा रस्ता आकर्षक दिसत आहे. तसेच या घाट रस्त्याच्या सभोवताली असलेली खिंड व हिरवीगार झाडेझुडपे प्रवाशांना देखील नक्कीच आकर्षित करतील.

हा घाट रस्ता लवकरात लवकर सुरू झाल्यास प्रवाशांना तासन-तास होणाऱ्या खेड घाटांमधील ट्रॅफिक जाम च्या समस्येवर मात करणे शक्य होणार आहे.