“पथनाट्य हे लोकचळवळीचे प्रभावी माध्यम!” – माधव राजगुरू

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ “पथनाट्य हे लोकचळवळीचे प्रभावी माध्यम आहे! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. अभिजन वर्गाबरोबरच जनसामान्यांपर्यंत हे अभियान पोहचावे यासाठी पथनाट्य अतिशय उत्तम साधन आहे!” असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि अक्षरभारती या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष माधव राजगुरू यांनी पिंपळे-गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे व्यक्त केले. मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून शब्दधन काव्यमंच आणि अक्षरभारती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माय मराठी’ या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर, प्रा. धनंजय भिसे, आम्ही सावित्रीच्या लेकी मंचाच्या अध्यक्ष रविना आंगोळकर, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, सविता इंगळे, डॉ. पी.एस. आगरवाल, आय.के. शेख, तानाजी एकोंडे, अक्षरभारतीचे कार्याध्यक्ष श्रीकांत चौगुले, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे आशयसूत्र केंद्रस्थानी ठेवून ‘माय मराठी’ या पथनाट्याचे अतिशय प्रभावी सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्यामध्ये प्रकाश घोरपडे (संत तुकाराम), विजया नागटिळक (सावित्रीची लेक), सुभाष चव्हाण (शिक्षक), नंदकुमार कांबळे (गावातील पुढारी), आण्णा जोगदंड (मराठी भाषा प्रचारक), निशिकांत गुमास्ते (साहित्यप्रेमी), शरद शेजवळ आणि शामराव सरकाळे (शेतकरी ग्रामस्थ) यांच्या भूमिकांमधून मराठीचा इतिहास आणि प्राचीनता, अभिजात भाषेचे निकष पूर्ण करण्याची क्षमता, मराठीतून संवाद आणि शिक्षणाचे माध्यम तसेच दैनंदिन व्यवहार करण्याचे आग्रही प्रतिपादन करीत भविष्यात मराठी भाषेला निश्चित उज्ज्वल काळ आहे असे अनेक संदेश पथनाट्यातून देण्यात आले. चपखल वेषभूषा, आशयघन संवाद, अभंगांचे गायन आणि संयमित अभिनय यामुळे कमी वेळात खूप मोठा परिणाम पथनाट्याच्या माध्यमातून साधला गेला. त्याच बरोबर जेष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, कवी सुरेश कंक, पुण्याचे कवी राजेंद्र वाघ यांनी मराठी मराठी भाषादिनानिमित मराठी पुस्तकांचे वाचकांना वाचनसंस्कृती व मराठी भाषा वाढीसाठी मोफत चौकाचौकात वाटप करण्यात आले .
पथनाट्यानंतर प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी भाषेची समृद्धी कथन केली; तर श्रीकांत चौगुले यांनी, ‘जोपर्यंत ज्ञानोबांच्या ओव्या आणि तुकोबांचे अभंग अस्तित्वात आहेत, तोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहील, अशी ग्वाही दिली. उपस्थित श्रोत्यांना तुकोबांच्या वेषातील प्रकाश घोरपडे यांनी संत ज्ञानेश्र्वर महाराज लिखित हरिपाठ अभंगांच्या पुस्तिकांचे वितरण केले.
कार्यक्रमाच्या संयोजनात मल्लिकार्जुन इंगळे, मीरा कंक, फुलवती जगताप, आनंद मुळूक, उमा माटेगावकर, विलास कुलकर्णी, दैवता घोरपडे, प्रदीप तरडे, जयश्री गुमास्ते, प्रथमेश जगदाळे यांनी सहकार्य केले. शब्दधनचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले. पंकज पाटील यांनी आभार मानले. भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *