वडगाव कांदळीत जनावरांमध्ये आढळला लम्पी स्किन डिसीज आजार
वडगाव कांदळी :(प्रतिनिधी -पोपट बढे )
वडगाव कांदळी (ता. जुन्नर ), येथे लम्पी स्किन डिसीज या आजाराच्या लक्षणाची 7 जनावरे आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे. हा विषाणूजन्य साथीचा चर्मरोग असून या रोगाचे जंतू देवी विषाणू गटातील कॅम्प्रीपाॕक्स प्रवर्गातील असून मुख्यत्वे हा आजार गाई व म्हशीमध्ये आढळून येतो या आजारात जनावरांच्या त्वचेवर गाठी येतात या गाठींचे प्रमाण डोके, मान,कास या भागात जास्त असते.लम्पी स्किन डिसीज या आजाराचा प्रसार कीटकांद्वारे होत असल्याने गोठ्यावर कीटकनाशक फवारणी तसेच डास, गोचीड निर्मूलन करणे महत्त्वाचे असते.

वडगाव कांदळी हद्दीत 7जनावरे या आजाराने बाधित असल्याचे आढळल्याने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी. व्ही. जाधव यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शीतल मुकणे यांच्याशी संपर्क केला व त्यांनी तात्काळ प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा केला. वडगाव कांदळी येथील बाधित जनावरांपासून परिसरातील पाच किलोमीटर भागातील जनावरांना खबरदारी म्हणून तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.महेश शेजळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळवंडीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश खिलारी, वडगाव कांदळीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी. व्ही. जाधव यांच्यासह तालुक्यातील 25 शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टरांनी लस देण्यासाठी सहकार्य केले. वडगाव कांदळी, कांदळी, नगदवाडी या गावांतील 2482 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार होण्यास मोठ्या प्रमाणात अटकाव होणार आहे.

लम्पी स्किन डिसीज या आजाराबाबत बोलताना पशुवैद्यकीय डॉक्टर मंगेश खिलारी यांनी सांगितले की हा आजार संसर्गजन्य असून डास, माशी, गोचीड यांच्यापासून तसेच एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास याचा प्रसार होतो या आजाराने गाईची कातडी खराब होतात, दूध उत्पादनामध्ये घट होते, जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते. या आजाराचा विदर्भ व मराठवाड्यात जास्त प्रादुर्भाव आढळतो परंतु अलीकडे जुन्नर तालुक्यात वडगाव कांदळी येथे 7 बाधित जनावरे आढळलेली आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 2482 जनावरांना लस टोचण्यात आली आहे. या आजाराची जनावरांत लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत, गोचीड निर्मूलन करावे, जनावरांची ने-आण बंद करावी. या लसीकरणासाठी वडगाव कांदळी, कांदळी, नगदवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले.