शिवसेना भवनाचा ताबा घेण्यासाठी त्यांचे बाप आले पाहिजेत – संजय राऊत
२९ डिसेंबर २०२२
नागपूर
मुंबई महापालिकेतील कार्यालयावर शिंदे गटाने ताबा घेतला आहे. दरम्यान शिंदे गट शिवसेन भवनाचाही ताबा घेण्याचा प्रयत्न करु शकतो अशी चर्चा आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राऊत केवळ टीका करूनच थांबले नाहीत तर त्यांनी शिंदे गटाचा थेट बापच काढला आहे. शिंदे गट एका बापाचे असतील तर शिवसेना भवनाकडे येतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, ते घुसखोरच आहेत. त्यांना स्वत:चं अस्तिव नाही. ते कुठेही घुसत असतात. हातात सत्ता आहे. ही झुंडशाही आणि मस्तवालपणा सत्तेमुळेच आहे. सत्तेशिवाय समोरासमोर या, मग दाखवतो. काल शिवसैनिकांनी दाखवलं ना. काल शिवसैनिक गेले. त्यांनी दाखवून दिलं. गद्दारांची एक पद्धत आहेत. गद्दार कुठेही घुसतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेना भवनाचा ताबा घेणार अशी चर्चा आहे, असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की त्यांचे बाप आले पाहिजेत. जर त्यांचा बाप असेल तर येईल. एक बाप असेल तर येतील. हे मी ऑन रेकॉर्ड सांगत आहे. शिवसेना भवनाचा ताबा कोण घेणार? शिवसेना भवन शिवसैनिकांचं असून, बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली वास्तू आहे. ती बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाने राहील. ती आमची आहे. अशा घोषणा, वल्गना फार होतात. तुमच्याकडे औटघटकेची सत्ता आहे ती सांभाळा. अशी भाषा वापरलीत तर महाराष्ट्रातील वातावरण बिघडेल. आणि जर तुम्हाला वातावरण बिघडवायचं असेल तर आमची तयारी आहे, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.