‘चुनचून के’ मारण्याची आणि ‘अरे ला कारे’ने उत्तर देण्याची भाषा करणारे आता गेले कुठं?; रोहित पवारांचं ट्विट

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही भागांवर दावा केल्यानंतर वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील आणि देसाई यांना बेळगावात न जाण्याची सूचना केल्याने हा दौरा रद्द झाला आहे. यावरून आता रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

देशात महाराष्ट्राची आदरयुक्त भीती असताना आज शेजारच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री दौरा रद्द करतात. इतकी लाचारी का आणि कोणासाठी? आगामी निवडणुका बघता अशा भूमिका घेण्यासाठी दबाव असेलही, पण त्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेची किंमत मोजणं आणि स्वाभिमान गहाण टाकणं योग्य नाही. असं खोचक ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

सत्तेच्या धुंदीत असलेल्या सरकारला याचा विसर पडलेला दिसतो. दुसरीकडं महाराष्ट्रात भर कार्यक्रमात गोळीबार करणारे, शिवीगाळ करणारे, महिलांविषयी अपशब्द वापरणारे, ‘चुनचून के’ मारण्याची आणि ‘अरे ला कारे’ने उत्तर देण्याची भाषा करणारे आता गेले कुठं? असाही प्रश्न यानिमित्ताने पडतो. असंही ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *