पालिकेच्या करसंकलन विभागाकडून कराची बिले न देताच जप्तीच्या नोटीस

०५ डिसेंबर २०२२

पिंपरी


पालिकेच्या करसंकलन विभागाकडून मिळकतीच्या कर थकबाकी वसुलीची मोहीम सध्या जोरात राबविण्यात येत आहे. परंतु शहराच्या अनेक भागात मिळकत कराची बिले न देताच, मालमत्ता धारकांना सरळसरळ जप्ती नोटीस दिल्या जात असल्याने, अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करताना साईटमध्ये अडचणी येत आहेत, त्यामुळे त्यात सुधारणा करण्याची मागणी करदात्यांनी केली आहे. ज्या इमारती, सदनिका नव्याने बांधण्यात आलेल्या आहेत, अशा अनेक ठिकाणी कर आकारणी सुरू झाली की नाही?, याची माहिती संबंधित मालकाला नसल्याची बाब पुढे आली आहे.

अनेक भागात कर आकारणी बिले वाटण्यात गोंधळ आहे आणि बिले आली नसल्याने आपला मालमत्ताकर अजून सुरू झाला नसेल असा अनेकांचा संभ्रम होतो. त्यात अचानकपणे जप्तीची नोटीस हातात मिळताच अनेकांना धक्का बसत आहे. याशिवाय मिळकतकर भरायला पालिकेने सुरू केलेल्या ऑनलाईन सुविधेमध्ये कराचा भरणा करताना पेमेंट स्वीकारले न जाणे, त्यात एरर येणे,पेमेंट होल्ड होणे असे प्रकार निदर्शनास येत आहेत. तसेच साईटमध्ये नावाच्या आधारे मालमत्ता शोधून त्याआधारे करभरणा करण्याची सुविधा नसल्याने, ज्या नागरिकांना आपले मालमत्तेचे विवरण माहीत नसतील त्यांना त्यामुळे कर भरणा करणे होत नसल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे पालिकेने या सुविधांमध्ये सुधारणा करून, अपडेट अशी भरणा सुविधा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *