‘तात्या कधी येताय…वाट पाहतोय’, अजित पवारांकडून वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर

०५ डिसेंबर २०२२


तात्या कधी येताय… वाट पाहतोय… अशी खुली ऑफरच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना दिली आहे. अजित पवार यांनी जाहीरपणे वसंत मोरे यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मोरे हे आधीच मनसेत नाराज आहेत. त्यात आता त्यांना थेट राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानेच पक्षात येण्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याने तात्या अर्थात वसंत मोरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एका विवाह सोहळ्यामध्ये वसंत मोरे आणि अजित पवार या दोघांनीही हजेरी लावली होती. त्याचवेळी अजित पवार- वसंत मोरे यांची भेट झाली आहे. भेटीवेळी अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्यासाठीची ऑफर दिली आहे. अजित पवार तात्या कधी येता… वाट पाहतोय, असं म्हणाले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अशी विचारणा करतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तसेच माझ्या कार्याचीही पावती आहे. मात्र मनसे सोडण्याबाबत विचार केलेला नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले. वसंत मोरे हे मनसेच्या कार्यपद्धतीला वैतागले आहेत. त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली आहे, तसेच पक्षाविरोधात आपली उघड नाराजी बोलूनही दाखवली आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून आपली वारंवार अवहेलना केली जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *