रिक्षाचालकाला मारहाण करून पळवली रिक्षा
१५ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून त्यांची रिक्षा पळवून नेल्याची घटना आकुर्डी येथे घडली. या प्रकरणी इम्रान अब्दुलरशीद शेख (रा. गोल्डन चौक, बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे रिक्षाचालक असून, ते एक भाडे घेऊन आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात आले होते. त्यावेळी त्यांच्या रिक्षाचा पाठलाग करीत दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांना रिक्षातून बाहेर ओढून आरोपींनी कमरेच्या पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांची रिक्षा घेऊन निगडीच्या दिशेने पसार झाले. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.