विनयभंगाची व्याख्या काय, हे एकदा गृहमंत्री आणि सगळ्याच भाजपा नेत्यांनी अभ्यासण्याची गरज आहे – सुषमा अंधारे

१५ नोव्हेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात दाद मागितली होती. आव्हाडांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून हे सगळं आधीपासून ठरलेलं होतं, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून त्यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय संविधानात ९९ दोषी सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये असं म्हटलं आहे. तरी ज्या पद्धतीने संजय राऊतांना अटक झाली आणि न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितलं की ही अटकच बेकायदा होती. आता पुन्हा नवा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत होत आहे. विनयभंगाची व्याख्या काय, हे एकदा गृहमंत्री आणि सगळ्याच भाजपा नेत्यांनी अभ्यासण्याची गरज आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.बाजूला व्हा असं म्हणणं विनयभंग असेल, तर अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करावे लागतील? पण आम्ही असं म्हटलं तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ बंधू चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की जे लोक समर्थन करतायत, त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू. मग चंद्रशेखरदादा, ना आपण गृहमंत्री आहात, ना आपण कोणत्या न्यायालयीन पदावर आहात. आपण असा फतवा कसा काढू शकता?”, असा सवाल सुषमा अंधारेंनी चंद्रशेखर बावनकुळेंना विचारला आहे.“जर खरंच आपल्याला वाटत असेल की समर्थन करणाऱ्यांनाही तुम्ही अटक कराल, तर कायद्याची अभ्यासक म्हणून सांगते, होय. आम्ही जितेंद्र आव्हाड यांना समर्थन देतोय. तुम्हाला अटक करायची असेल, तर तुम्ही बिनधास्त अटक करू शकता. महाराष्ट्राला एकदा कळू द्या की तुमची मनमानी आणि सूडबुद्धीचं राजकारण कोणत्या पातळीवर जात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *