शिरूर : निलेश वाळुंज यांचे कृशिपंप चोरी व इतर मागण्यांसंदर्भातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित

निलेश वाळुंज यांचे कृशिपंप चोरी व इतर मागण्यांसंदर्भातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. २५/०३/२०२४.

शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांनी दि २६ मार्च २०२४ रोजी आमरण उपोषण आंदोलन पुकारलेले होते. शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कृषीपंप व साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाळुंज यांनी शासन व प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार केलेले होते. त्याच विषयावर अनेकदा बैठकाही झालेल्या होत्या. परंतु त्यावर ठोस अशी कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने वाळुंज यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने वाळुंज यांना उपोषण न करण्याची विनंती करण्यात आल्याने, त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे वाळुंज यांनी सांगितले. तसेच वाळुंज यांच्या इतर उर्वरित मागण्या, तक्रारी संदर्भातील मागण्यांचा प्रस्ताव/अहवाल पुढील आठ दिवसांच्या आत मार्गी लावण्यात येईल व त्या संदर्भातील अहवाल वरीष्ठ कार्यालयास पाठवण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही तहसीलदारांकडून वाळुंज यांना सदर इतिवृत्त देतेवेळी आश्वासन देण्यात आले आहे.


गेली अनेक महिन्यांपासून कृषीपंपांच्या चोऱ्यांबाबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त हे अनेकदा पाठपुरावा करूनही मिळत नसल्याने, तसेच शिरूर तहसील व महसुलमध्ये घडत असलेल्या गैरप्रकारांबाबत, संदर्भित पुराव्यांसह तक्रारी करूनही तहसिल/महसुल स्तरावरून कोणतीच कारवाई होत नसल्याने, सदर प्रकरणाबाबत वाळुंज यांनी शासनाच्या विविध स्तरांवर निवेदने सादर केलेली होती. तसेच याबाबत दखल घेत नसल्यामुळे आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही वाळुंज यांनी दिलेला होता. त्याच पार्श्वभूमीवर या सर्व गंभीर बाबी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण श्री. अण्णासाहेब हजारे यांच्याकडे राळेगण सिध्दी येथे जाऊन वाळुंज यांनी तींडी सांगून तसे निवेदनही दिले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारी व पत्रकार बांधवही होते.
दरम्यान या सर्व बाबींची जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचेकडून दखल घेण्यात आली होती. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून तहसीलदार शिरूर यांना योग्य त्या सूचनाही देण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी पुढील कार्यवाही सुरू केली असल्याचे सांगण्यात आलेय.
त्यानुसार दि. २४ मार्च २०२४ रोजी तहसीलदार शिरूर यांनी वाळुंज यांच्याशी या विषयावर समक्ष बोलत व दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी तहसिल कार्यालय शिरूर येथे घेण्यात आलेल्या कृषीपंपांच्या चोऱ्यांसंदर्भातले इतिवृत्त, वाळुंज यांना तहसील कार्यालय शिरूर येथे देण्यात आले.
तसेच वाळुंज यांच्या उर्वरित मागण्या व तक्रारींसंदर्भांत येत्या आठ दिवसांच्या आत त्या बाबी मार्गी लावण्यात येऊन, तसा अहवाल वरीष्ठ कार्यालयास पाठवण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदारांकडून वाळुंज यांना आश्वासन देण्यात आलेय. त्यामुळे दि. २६/०३/२०२४ रोजीचे करण्यात येणारे आंदोलन हे तात्पुरते स्थगित केल्याची माहिती वाळुंज यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *