नारायणगाव | विभागीय कृषी प्रशिक्षण ठरले कृषी क्षेत्राला नवीन दिशा देणारे..

विभागीय कृषी प्रशिक्षण ठरले कृषी क्षेत्राला नवीन दिशा देणारे

नारायणगाव – (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माणिकडोह यांच्या सहयोगाने पुणे विभागीय पातळीवरील कृषी गटातील हॉर्टिकल्चर, क्रॉप सायन्स आणि ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी टेक्नॉलॉजीच्या पुर्ण वेळ शिक्षकांचे निवासी प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, नारायणगाव (पुणे) येथे हे प्रशिक्षण नुकतेच पार पडले.
या कृषी प्रशिक्षणात पुणे विभागातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, आणि पुणे जिल्ह्यातील अकरावी आणि बारावीला अध्यापन करणाऱ्या उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षकांचा समावेश होता.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहेर यांनी कृषी अभ्यासक्रमातील तरतुदी व समाजाची गरज असलेल्या क्षेत्रात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची सांगड घालून विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.


प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप
प्रसंगी पुणे विभागाचे सहसंचालक रमाकांत भावसार यांनी विद्यार्थी केंद्रित प्रशिक्षण व्यवस्थेत लागणारे सर्वोतोपरी साहाय्य प्रादेशिक कार्यालयाकडून दिले जाईल, याची ग्वाही दिली. सहभागी शिक्षकांमधील डॉ. प्रदीप खांडेकर आणि प्रशिक्षण समन्वयक डाॅ. सत्यवान थोरात यांनी प्रशिक्षणाचा दर्जा उच्चतम राखण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला.
प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहर यांनी नाविन्यपूर्ण कल्पना प्रकल्पाद्वारे प्रत्यक्षात आणण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या साहाय्याने जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना केले.
भौतिक सुविधा आणि तज्ज्ञ कृषी मार्गदर्शक उपलब्ध झाल्यामुळे प्रशिक्षण यशस्वी झाल्याचे पुणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उदय शंकर सूर्यवंशी यांनी सांगितले.
या निवासी प्रशिक्षणामध्ये पुणे विभागातील ३४ महाविद्यालये आणि ८९ शिक्षक सहभागी झाले होते. विविध कृषीतज्ज्ञ तसेच कृषी औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, शासकीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
माणिकडोह येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्राचार्य अशोक टेके, अविनाश मेहेर, सुनिल गिरमे, प्रणव येसणे, हितेश परदेशी, प्रसाद वासाळे, घोडेगाव आस्थापनेचे भांगरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपणासाठी साहाय्य केले.
समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये ब्रेम्बो ब्रेक इंडिया लिमिटेडचे किशोर केंचे यांनी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे कार्यक्रमात सहभाग घेऊन सर्व शिक्षकांशी संवाद साधला.
या प्रशिक्षण वर्गासाठी प्राचार्य दत्तात्रय जगताप आणि कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी मोलाचे सहकार्य केले.
संपूर्ण प्रशिक्षण वर्गाचे सूत्रसंचालन स्वाती जव्हेरी यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील आधुनिक कृषी पंढरी अशी ओळख असलेल्या ठिकाणी दूरगामी परिणाम करणाऱ्या व आठवणीत राहणाऱ्या प्रशिक्षणाची यजमानपदाची संधी गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिराला दिल्याबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे यांनी प्रशासनाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *