नारायणगाव : किल्ले शिवनेरी गडावर २१ मार्च पासून प्लास्टिक बंदी

किल्ले शिवनेरी गडावर २१ मार्च पासून प्लास्टिक बंदी

नारायणगाव : (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
किल्ले शिवनेरी गडावरील जैवविविधता अबाधित रहावी व येणाऱ्या पर्यटकांना ते वैभव पाहून किल्ले शिवनेरीवर येण्यासाठी सतत भुरळ पडावी म्हणून २१ मार्च २०२४ पासून किल्ले शिवनेरी गडावर प्लास्टिक बंदी संकल्पना राबविण्यात येत आहे. अशी माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
सर्वसामान्य लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी यासाठी “२१ मार्च” हा दिवस “जागतिक वन दिन” म्हणून १९७१ मध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. जागतिक वन दिन साजरा करण्यामध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचा सुद्धा मोलाचा वाटा होता. संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला.


याच दिनाचे औचित्य साधून वनविभाग जुन्नर चे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी किल्ले शिवनेरी वर येणाऱ्या पर्यटकांना आवाहन केले आहे की २१ मार्च २०२४ पासून किल्ले शिवनेरी गडावर आपणास पाण्याची बाटली सोडून कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक तसेच तंबाखू , गुटखा, माचीस, बिडी सिगारेट घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. वाढत्या उन्हामुळे आपणास फक्त पाण्याची बाटली किल्ल्यावर घेऊन जाण्यासाठी परवानगी असेल‌ परंतु ती पाण्याची बाटली पुन्हा खाली येताना घेऊन येणे अनिवार्य करण्यात येत आहे.

५ जुन २०२४ पासून पुढे कायमस्वरूपी किल्ल्यावर प्लास्टिक पाण्याची बाटली घेऊन जाण्यासाठी बंदी असेल. वनविभाग जुन्नर व पुरातत्व विभागामार्फत पिण्यासाठी फिल्टरचे पाणी ठिक ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे.
किल्ले शिवनेरी गडावर पर्यावरण नावाची श्रीमंती भविष्यात जतन आणि संवर्धीत राहण्यासाठी ही ठोस पावले वनविभागामार्फत उचलली जात असुन पर्यटकांनीही यासाठी प्रतिसाद द्यावा तसेच तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *