संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचा ‘प्रोजेक्ट अमृत’ स्वच्छता उपक्रम उत्साहात

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचा ‘प्रोजेक्ट अमृत’ स्वच्छता उपक्रम उत्साहात

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या सानिध्यात ‘अमृत प्रकल्प’ अंतर्गत ‘स्वच्छ जल , स्वच्छ मन’ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे यमुना नदीच्या छठ घाटावर उद्घाटन करण्यात आले. बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन, हा प्रकल्प भारतातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १५३३ हून अधिक ठिकाणी ११ लाखाहून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला. तीर्थक्षेत्र आळंदी – देहू सह ४३ ठिकाणी मोहीम राबविण्यात आली. यात आळंदीतील इंद्रायणी नदी घाट देखील स्वच्छ करण्यास स्वयंसेवकांचे लक्षणीय योगदान राहिले. यासाठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचेसह विविध सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सदगुरू माताजींनी अमृत प्रकल्पाच्या निमित्ताने आपल्या आशीर्वादात सांगितले की, पाण्याचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे आणि ते अमृतासमान आहे. पाणी हा आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे.देवाने दिलेल्या या स्वच्छ आणि सुंदर सृष्टीची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आपण प्रत्येकाला आपल्या कृतीतून प्रेरित केले पाहिजे, केवळ शब्दांनी नाही. जेव्हा आपण प्रत्येक कणात असलेल्या भगवंताशी नाते जोडतो आणि त्याचा आधार घेतो, तेव्हा त्याच्या सृष्टीच्या प्रत्येक रूपावर आपण प्रेम करू लागतो.आपला प्रयत्न असा असावा की जेव्हा आपण हे जग सोडू तेव्हा या पृथ्वीला अधिक सुंदर रूपात सोडून जाऊ.

तीर्थक्षेत्र आळंदी – देहू सह ४३ ठिकाणी मोहीम

या अभियानात इ प्रभाग अधिकारी राजेश आगळे, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचेसह सेवक, साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियानामध्ये इंद्रायणी नदी घाट आळंदी, वैकुंठ स्मशान भूमी, इंद्रायणी नदी घाट चऱ्होली येथील पाण्यात पडलेला प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा ,अपशिष्ट (निरुपयोगी) पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ, जलपर्णी तसेच जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ जाळी युक्त काठ्यांचा वापर करुन स्वच्छ करण्यात आले तसेच नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला. संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदांनी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती दिली. ‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा,घोडनदी, पवना, वेळू, कुकडी, मीना, कऱ्हा, आनंदी अशा नद्यांवरील विविध घाट तसेच शहरातील विविध तलाव अशा ४३ ठिकाणी एकाच वेळी विशाल स्वच्छता अभियान राबविण्यात आले ज्यामध्ये ओंकारेश्वर नदी घाट ,कात्रज तलाव ,आळंदी – देहू येथील इंद्रायणी नदी घाट ,मोरया गोसावी येथील पवना नदी घाट, झुलेलाल घाट,खडकवासला धरण परिसर, नाझरे धरण,पाषाण तलाव इत्यादी ठिकाणे प्रमुख आहेत.त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच ठिकठिकाणचे प्रशासकीय कर्मचारी ८००० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचा सेवक देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.

 

इंद्रायणी नदी घाट स्वच्छता स्वयंसेवकांचे लक्षणीय योगदान

यावेळी मिशनचे कार्याचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. निरंकारी सदगुरू माताजींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की जलसंधारण आणि जल स्वच्छता या कल्याणकारी प्रकल्पाद्वारे मिशनने निसर्ग संवर्धनासाठी नक्कीच योगदान देऊन एक महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *