शिक्रापूरच्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्राम पंचायत, प्राणीमित्र व NGO चा पुढाकार

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.

सध्या सर्वत्रच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने, त्यांचा नाहक त्रास सर्वसामान्यांना होताना दिसत आहे. कधी ही भटकी कुत्री लहान मुलांना मोठ्या माणसांना चावल्याच्या घटना समोर येतात, तर कधी त्यांच्यामुळे अपघात झालेलेही ऐकायला मिळते.
अशीच काहीशी परिस्थिती पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या शिक्रापूर या मोठ्या ग्राम पंचायत हद्दीत जाणवत होती. येथील अनेकांना श्र्वानांनी दंश केलेला होता, अनेक अपघातांना कारणीभूत येथील श्वान झालेले होते. शिवाय श्वान दंशानंतर अशा रुग्णांना पुढे निर्माण होणाऱ्या समस्या या खूप वाईट असल्याने, शिक्रापूर येथील प्राणीमित्र व डॉ ज्योती खडे यांनी शिक्रापूर ग्राम पंचायतशी संपर्क साधत, यावर काम करणाऱ्या त्यांच्या माहितीतील NGO मार्फत काही योग्य असा बंदोबस्त करता येईल का ? अशी कल्पना मांडल्यावर, ग्राम पंचायतनेही यास दुजोरा देत एक चांगले पाऊल उचलण्याचे ठरविले. त्याप्रमाणे PET FORCE या NGO संस्थेच्या विनोद साळवी यांच्याशी संपर्क साधला. ही संस्था भटक्या कुत्र्यांवर गेली सात वर्षांपासून काम करत आहे. त्यात अशा भटक्या कुत्र्यांना पकडुन लस टोचणे व नसबंदी करणे इत्यादी उपचार केले जातात. त्यानुसार दि. ०८/०२/२०२४ पासून या चांगल्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती शिक्रापूर ग्राम पंचायतचे सरपंच रमेश गडदे व ग्राम विकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कला दिली.
ही मोहीम सुरू करतेवेळी डॉक्टर ज्योती खडे, उपसरपंच सीमा लांडे, सुभाष खैरे, त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, सारिका सासवडे, कृष्णा सासवडे, विशाल खरपुडे, रमेश थोरात, मयूर करंजे, वंदना भुजबळ, मोहीनी मांढरे, मोहिनी युवराज मांढरे, उषा राऊत, शालन राऊत, पूजा भुजबळ, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
शिक्रापूर ग्रामस्थांनी या मोहिमेस सहकार्य करून शिक्रापूर गाव रेबीज मुक्त करण्याचे आवाहन सरपंच रमेश गडदे यांनी केलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *