जागतिकीकरणामुळे शिक्षण क्षेत्रातही तीव्र स्पर्धा – प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे

शि. प्र. मंडळींच्या निगडी शाळेतील प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिकीकरणामुळे उद्योग, व्यवसाय बरोबरच शिक्षण क्षेत्रातही तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. पुढील काही वर्षात परदेशातील नामवंत विद्यापीठे आपल्या शहरांमध्ये शैक्षणिक संकुले उभे करून शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. तंत्रज्ञान रोज विकसित होत आहे, या नव तंत्रज्ञानाचा वापर वेळोवेळी शालेय अभ्यासक्रमात झाला पाहिजे. भविष्यात विकसित भारत होण्यासाठी आपली अर्थव्यवस्था देखील वेगाने वाढली पाहिजे. यासाठी उद्याचा नागरिक म्हणजे आजचा विद्यार्थी देखील या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तेवढाच सक्षम असला पाहिजे. विद्यार्थ्यांचे विचार करण्याची क्षमता आणि मानसिकता विकसित झाली, तरच नवतंत्रज्ञानाद्वारे संकल्पना साकारता येतील. त्यांना घडवण्याची जबाबदारी आता शिक्षकांबरोबरच पालकांची देखील आहे त्यासाठी त्यांनी देखील प्रगल्भ आणि कौशल्यवान झाले पाहिजे असे मार्गदर्शन
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.


शिक्षण प्रसारक मंडळीच्या यमुनानगर, निगडी येथील इंग्रजी व मराठी माध्यम शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसीय भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि.१७) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, मुख्याध्यापिका लीना वर्तक, ज्योति बक्षी, सविता बिराजदार, रवींद्र मुंगसे तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
मोबाईल सारख्या भौतिक गोष्टीकडे नवीन पिढी आकर्षित होत असताना या प्रदर्शनात लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली होती हे आशादायी चित्र आहे. हे प्रदर्शन रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुले असून सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या विविध दालनास पालक, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी भेट देऊन मनसोक्त खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांनी केले आहे.
येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी चित्रांचे कोलाज आणि पुस्तके, गोविज्ञान व आधारित वस्तू आणि त्यावरील पुस्तके तसेच विविध प्रकारची झाडे यांचे प्रदर्शन व विक्री दालने थाटण्यात आली आहेत. विद्यार्थी, पालक व प्रेक्षकांनी खाऊ गल्लीत विविध खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर गर्दी केली होती.
स्वागत प्रार्थना स्नेहल देशपांडे, शुभांगी डोंगरे, रमा जोशी यांनी सादर केली. प्रास्ताविक रवींद्र मुंगसे, आभार शोभा जोशी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *