शिरूर शहरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यक्रमांची चढाओढ…

शिरूर शहरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यक्रमांची चढाओढ…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. १४/०२/२०२४.

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने, अनेक ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
शिरूर शहरात अनेक संस्था, संघटनांच्या वतीने छोटे छोटे हळदी कुंकू समारंभ सुरू होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाच्या शिरूर शहर महिला अध्यक्षा श्रुतिका रंजन झांबरे यांनी ४-५ दिवसांपूर्वी शिरूर येथील रयत शाळेच्या मैदानावर भव्य हळदी कुंकू समारंभ घेण्यात येणार असल्याचे, पत्रकार बांधव व अनेकांना सांगितलेले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रावहिनी पवार यांना आमंत्रित केलेले होते. तसेच खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे प्रसिद्ध निवेदक क्रांती मळेगांवकर यांचाही कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. हा कार्यक्रम गुरुवार दि. १५/०२/२०२४ रोजी संध्याकाळी रयत शाळेच्या मैदानावर ठेवण्यात आला असून, अनेक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. त्याची जय्यत तयारी देखील सुरू आहे.


परंतु आज बुधवार दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी अचानकपणे व जास्त गाजावाजा न करता, शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार ॲड अशोकबापू पवार यांच्या पत्नी व पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशूसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाताभाभी पवार यांच्या पुढाकारातून, शिरूर येथील जुन्या नगर पालिकेच्या समोरील पंचायत वाड्यामध्ये, शुक्रवार दि. १६/०२/२०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची कार्यक्रम पत्रिका सोशल मीडियावर आल्याने, शिरूरकरांमध्ये मात्र या दोन्ही गटांमधील हळदी कुंकू कार्यक्रमांच्या चढाओढीची जोरदार चर्चा रंगत आहे. या कार्यक्रमासाठी शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे हे उपस्थित राहणार आहेत.


त्यामुळे मूळच्या असणाऱ्या राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटांमध्ये, आगामी काळातही निवडणुकींच्या तोंडावर अशीच स्पर्धा चालू राहील, यात तिळमात्र शंका दिसत नाही. कारण शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार व विद्यमान खासदार हे दोघेही सध्या “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार” गटामध्ये आहेत. तर शरदचंद्र पवार यांना सोडून “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,” म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे गेलेले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी व त्या सर्वांचे नेतृत्व करणारे, तसेच आमदार ॲड अशोक पवार यांचे पूर्वीचे खंदे समर्थक तथा तत्कालीन तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, यांनी देखील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी फौज गोळा करत अजितदादांना शिरूर तालुक्यातून चांगली ताकद दिल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे शिरूर तालुक्यात आता दोन बापू, म्हणजेच “सख्खे मित्र, पक्के वैरी (राजकीय)”, झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भविष्यात या दोन्ही बापूंचा राजकीय सत्तासंघर्ष प्रकर्षाने समोर आला तर काही वावगे ठरणार नाही असेच आत्ताचे चित्र दिसते आहे.
अजितदादा गटात गेलेले रवीबापू, यांनी या गटाचे तालुकाध्यक्ष पद स्वीकारत, शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान आमदार ॲड अशोकबापू पवार व त्यांच्या पत्नी सुजाताभाभी पवार, या दोघांचे एकेकाळी अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे शिरूर शहरातील त्यांचे कट्टर कार्यकर्ते रंजनभैय्या अशोक झांबरे व त्यांच्या पत्नी श्रुतिका रंजन झांबरे, यांना आपल्या गोटात सामील केल्याने रंजन झांबरे यांनी पडद्यामागून अनेक राजकीय सूत्रे हलवित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रविबापू काळे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना शिरूर शहरातून मोठी साथ व ताकद दिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पुढील राजकीय समीकरणांसाठी अजितदादा गटातील नेते व स्वतः अजितदादा, हे पडद्यामागील कलाकार रंजन झांबरे यांना एखादे चांगले पद देतात की काय ? हेच पुढे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सध्या मात्र या दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याने, शिरूर शहरात या दोन्ही गटांच्या हळदी कुंकू कार्यक्रमांच्या जोरदार चर्चा झडत असल्या, तरी मात्र शिरूरच्या महिलांसाठी विविध कार्यक्रमांच्या पर्वणीचा काळ व त्यातून मिळणाऱ्या भेटवस्तूंचा पाऊस पडणार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे. तरी यात काही पक्षांचे हळदी कुंकू व ईतर कार्यक्रम अजून तरी नीच्छीत झाल्याचे दिसत नसल्याने, ते जर का जाहीर झाले ! तर मात्र लोकांची दिवाळी झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच !
त्यामुळे आगामी निवडणुका लोकांसाठी आनंददायी ठरतीलच, पण मनोरंजकही ठरतील यात शंका दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *