पालक व शिक्षकांविषयी कृतज्ञता बाळगा – कवी प्रशांत मोरे
नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
आपल्या पालक, आईवडील आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता बाळगा. आईवडिलांच्या आधाराच्या छत्रामुळेच आपण सुरक्षित असतो. अहोरात्र राबणाऱ्या बापाची काळजी घ्या.कधीतरी मायेने वडिलांशी बोला.गुरुवर्यांच्या समर्पणातून उभे असलेले हे शिक्षण संकुल पाहून मी भारावून गेलो असे भावोद्गार प्रसिद्ध गीतकार, संगीतकार, गायक व लोककवी प्रशांत मोरे यांनी व्यक्त केले.
नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिरात आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर संचालक शशिकांत वाजगे, देवेंद्र बनकर, मुख्याध्यापिका अनुराधा पुराणीक, सुनंदा खाडे, उपमुख्याध्यापक सतीश तंवर, उपप्राचार्य हनुमंत काळे,पर्यवेक्षक विलास शिंदे, सुषमा वाळिंबे, रतिलाल बाबेल,संजय वलटे, डॉ.मिलिंद कसबे,पालक संघाचे पदाधिकारी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
” कविता जगण्याची उमेद देते,कविता,गाणी भरभरून म्हणा.मोबाईल सारख्या कृत्रिम संवाद निर्माण करणाऱ्या यंत्रापासून दूर राहा. नाती काळजापासून जपा.”असेही श्री. मोरे यांनी यावेळी सांगितले.
“गुरुवर्य नानासाहेब सबनीस यांनी श्रमसंस्काराचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवले. ग्रामविकासाची संकल्पना रुजवली. आपण आणि आपले शेजारी यांचा एकत्रित विकासाचे तंत्र त्यांनी समाजाला दिले.शासनाच्या छात्रसेना आणि राष्ट्रीय सेवा योजना पूर्वीच शाळेत ‘विद्यामंदिर कॅडेट कोअर’ (व्हीसीसी) छात्रसेना सुरू केली होती.त्यांच्या दूरदृष्टीतून व समर्पणातून हे शिक्षणसंकुल उभे राहिले आहे”असं मनोगत कृषीरत्न अनिलतात्या मेहेर यांनी व्यक्त केले.
या पारितोषिक वितरण समारंभात राष्ट्रीय, राज्य, खेळाडूंसह कला, क्रीडा,नाट्य,संगीत इत्यादी विविध क्षेत्रात यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार हनुमंत
कदम आणि मानसी भालेराव यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक यांनी केले.
उपमुख्याध्यापक सतीश तंवर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. पर्यवेक्षक रतिलाल बाबेल यांनी अहवाल वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा पाटे व रमेश शेटे यांनी केले.क्रीडा पारितोषिक वितरणाचे निवेदन क्रीडा प्रमुख बबन गुळवे आणि राहुल नवले यांनी केले व आभार पर्यवेक्षक संजय वलटे यांनी मानले.