अफू तस्करी करण्यासाठी दोन चारचाकी चोरणाऱ्याला राजस्थानातून अटक; गुन्हे शाखेची कामगिरी

पिंपरी : अफू तस्करी करण्यासाठी दोन चारचाकी गाड्या चोरणाऱ्या एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेतील युनिट क्रमांक १ च्या पोलिसांनी राजस्थान येथे जाऊन जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या असून अटक करण्यात आलेला आरोपी कुख्यात बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रमेश प्रभुराम बिष्णोई (वय २४, रा. सियागावपुर, ता. सांचौर, जि. जालोर, रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याने दोन्ही गाड्या अफू तस्करीसाठी वापरणार असल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार ५ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास निगडी प्राधिकरणातील शरद हौसिंग सोसायटीत राहणारे हेमंत भोसले यांची आय २० आणि नितीन पवार यांची क्रेटा या दोन गाड्या एकाच रात्री चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणाचा तपास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी शहर परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी या दोन्ही गाड्या घेऊन नाशिकच्या दिशेने गेल्याचे समजले. यावर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील येवल्यापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्या दोन्ही गाड्यांच्या नंबर प्लेट बदलून आरोपी राजस्थानच्या दिशेने गेल्याचे पोलिसांना दिसून आले.

या दोन्ही गाड्यांसोबत आणखी एक आय १० गाडी पोलिसांना दिसली. त्या गाडीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी त्या गाडीमालकाचा फोन नंबर ट्रॅक केला. तसेच त्याचे आदल्या दिवशीचे लोकेशन चेक केले असता ते नाशिक जिल्ह्यातील येवला असल्याचे समोर आले.त्यामुळे निगडी येथून चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारी या आरोपीनेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने चोरल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी रमेश बिष्णोई याच्या सांचौर या गावी जाऊन तपासाला सुरुवात केली. तेथे ते चार दिवस तळ ठोकून रमेश याला ट्रॅक केले. आणि सांचौर येथील मार्केटमधून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. मात्र पोलीस आल्याचे कळताच त्याचे इतर साथीदार पसार झाले.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, महादेव जावळे, फारुक मुल्ला, सोमनाथ बोऱ्हाडे, मनोजकुमार कमले, प्रमोद हिरळकर आणि तांत्रिक शाखेचे पोलिस हवालदार प्रशांत माळी यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *