निरामय जीवनासाठी आयुर्वेदाचे आचरण करा – नानासाहेब मेमाणे

निर्विकार आरोग्य दिनदर्शिका प्रकाशन

पिंपरी, पुणे (दि. २६ डिसेंबर २०२३) निरामय जीवनासाठी आयुर्वेदाचे आचरण करावे. “हर दिन हर किसी के लिये आयुर्वेद” हे नवीन वर्षाचे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे घोषवाक्य आहे. केंद्र सरकार सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याबाबत संवेदनशील आहे. अध्यात्म आणि आयुर्वेदाचा अवलंब केला तर आरोग्य निर्देशांक उत्तम राहील असे प्रतिपादन भक्ती वेदांत आयुर्वेद हॉस्पिटल व रिसर्च सेंटर मुंबईचे आयुर्वेद विभाग प्रमुख वैद्य नानासाहेब मेमाणे यांनी केले.
भोसरी येथील निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलच्या “निर्विकार आरोग्य दिनदर्शिका २०२४” चे प्रकाशन मेमाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक डॉ. निलेश लोंढे, ज्येष्ठ पत्रकार जयंत जाधव, श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त अनिल सौंदडे तसेच ज्ञान प्रबोधिनीचे मनोज देवळेकर, कामगार नेते सचिन लांडगे, पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, रोटरी क्लबचे विवेक येवले, वैद्य अरविंद कडूस, वैद्य संतोष सूर्यवंशी आणि निर्विकार हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक डॉ. निलेश लोंढे यांनी सांगितले की, या दिनदर्शिकेचे उद्धिष्ट प्रत्येक घरात आयुर्वेदाबदद्ल माहिती पोहचावी. स्वस्थ्य व्यक्तीच्या स्वास्थ्याचे संरक्षण करणे असे आहे. दिनचर्या, ऋतुचर्या, योगाभ्यास, सणांचे आयुर्वेदिक महत्व, पौष्टिक पाककृती, प्रकृती परीक्षण,आहारीय वर्ग व त्यांचे उपयोग, शरीरातील दोष वाढण्याची कारणे व त्यांचे उपाय याविषयी सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे.
स्वागत, प्रास्ताविक करताना संचालिका डॉ. सारिका लोंढे यांनी सांगितले की,भोसरी येथील निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे १५ बेडचे अत्याधुनिक कॅशेलेस मेडिक्लेम सुविधा देणारे व राष्ट्रीय अधिस्वीकृती रुग्णालय संस्थेची मान्यता (NATIONAL ACCREDITATION BOARD OF HOSPITALS – NABH) असलेले रुग्णालय आहे. येथे सुसज्ज आंतररुग्ण विभाग, पंचकर्मासाठी ६ कक्ष,३५ अनुभवी कर्मचारी आहेत. तसेच योग व रुग्णानुसार आवश्यक असेल तर आहार योजनेची विशेष सोय केली जाते. हजारो रुग्ण आंतररुग्ण विभागात उपचार घेऊन निरामय जीवन जगत आहेत. तसेच हजारो रुग्णांचे मेडिक्लेम आजपर्यंत मंजूर झाले आहेत.
सूत्र संचालन दिगंबर ढोकले आणि आभार डॉ. सारिका लोंढे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *