अलंकापुरीत हरिनाम गजरात ५ ते १२ डिसेंबर कार्तिकी यात्रा

कार्तिकी यात्रेत शासकीय यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन :- प्रांत जोगेंद्र कट्यारे

 

आळंदी तीर्थक्षेत्र आळंदीत कार्तिकी यात्रा २०२३ महावारी अंतर्गत श्र संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. आळंदी यात्रा ५ ते १२ डिसेंबर या कालावधीत होत आहे. यासाठी राज्यातून लाखो भाविक, नागरिक देवदर्शनास येत असतात. यासाठी शासकीय खात्यांतील विविध विभाग यांचे माध्यमातून कार्तिकी यात्रेस सेवा सुविधा देण्यास सूचनादेश दिले आहेत. सर्वानी शासकीय यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन करीत आळंदीकरांचे नेहमी सहकार्य असल्याने त्यांचे कार्याचे कौतुक खेडचे प्रांत जोगेंद्र कट्यारे यांनी केले.

 


कार्तिकी यात्रा नियोजन आढावा घेण्यास आळंदी नगरपरिषद सभागृहात प्रांत जोगेंद्र कट्यारे यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे समवेत सुसंवाद साधत नियोजन पूर्व आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रसंगी तहसीलदार प्रशांत बेडसे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहा. पोलिस आयुक्त राजेंद्र गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, मच्छिन्द्र पंडित, वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे पाटील, योगी निरंजननाथजी, नेहा जोशी, शिवसेना वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील, आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण ( शिंदे गट ), माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, काखेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, देवस्थांनचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे,नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, गट विकास अधिकारी विशाल शिंदे विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी विविध शासकीय विभाग प्रमुख तसेच उपस्थित मान्यवर यांचेशी संवाद साधून माहिती, उपक्रम, नियोजन जाणून घेत उपाय योजना सुचविल्या. कार्तिकी यात्रा सोहळयात प्रभावी आपत्ती व्यवस्थापन कक्ष ( नियंत्रण ) येथून यात्रेचे कामकाजावर नियंत्रण करण्यास सर्व खात्याचे प्रतिनिधी तैनात रहाणार आहेत. शांतता, कायदा, सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. भाविकांची रहदारीत गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. यात पदपथ आणि इतर ठिकाणचे अतिक्रमण काढून पदपथ अतिक्रमण मुक्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. आळंदीत विविध ठिकाणी तसेच प्रदक्षिणा रस्ता, इंद्रायणी नदी घाट, गोपाळपुरा, सिद्धबेट आदी ठिकाणी विद्युत व्यवस्था, पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा, शौचालये व्यवस्था, आरोग्याची काळजी घेत धुर फवारणी, जंतुनाशके फवारणी केली जाणार असल्याचे केंद्रे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे माध्यमातून आळंदीला जोडणारे सर्व रस्ते खड्डे मुक्त राहतील यासाठी तात्काळ उपाय योजना करण्याचे आदेश प्रांत कट्यारे यांनी दिले. शहरात तसेच इंद्रायणी नदीवर सीसीटीव्ही कॅमेरे लावून यात्रेवर तिसरा डोळ्याची नजर ठेवली जाणार आहे. यात्रा काळात भाविक, नागरिक तसेच मंदिर परिसर सुरुक्षीततेस प्राधान्य देण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील पथारी व्यावसायिक, विक्रेते यांचे व्यवसायाची जागा निश्चित करून कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचना आळंदी नगरपरिषदेस देण्यात आल्या आहेत. आळंदी नगरपरिषद, देवस्थान, दर्शनबारीची जागा यांच्यात सुसंवाद साधून दर्शनबारी तात्पुरत्या स्वरूपात विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महसूल, पोलीस, आरोग्य, नगरपरिषद प्रशासन तसेच स्थानिक नागरिक, पदाधिकारी यांनी सुसंवाद साधून कार्तिकी यात्रा काळात भाविकांना सेवा सुविधा पुरवाव्यात यासाठी प्रांत जोगेंद्र कट्यारे यांनी मार्गदर्शन केले. यात्रा काळात भाविक, नागरिकांच्या सुरक्षिततेस पोलीस प्रशासन खूप परिश्रम घेत असते. यामुळे सर्वानी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रांत कट्यारे यांनी केले. आळंदी ग्रामीण ग्रामीण रुग्णालय तसेच तालुका आरोग्य विभाग यांनी आपापल्या नियोजनाची माहिती दिली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ इंदिरा पारखे यांनी येथील पाणी नमुने तसेच हॉटेल तपासणी सह भाविकांना आरोग्य सेवा देण्यास प्राधान्य देत नियोजन केल्याचे सांगितले. रुग्णवाहिका, मेडीसिन, ओ.पी.डी. व आय.पी.डी.ची सोय तसेच माऊली मंदिरात देखील आरोग्य सेवा ऑक्सिजन सह तैनात करण्यात येणार आहे. यासाठी आळंदी देवस्थानने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. इंद्रायणी नदी वर जीवरक्षक, तसेच शहरात अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.
आळंदीतील देहू फाटा येथील वाहतूक कोंडी विचारात घेऊन वाय जंक्शन येथील बस व्यवस्था एस. टी. महामंडळाने पर्यायी व्यवस्थेचा शोध घेण्यास सूचना प्रांत कट्यारे यांनी केली. यासाठी संबंधित यंत्रणा यांनी सुसंवाद साधावा. मागील वर्षी ८५ बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. आवश्यकतेनुसार वाढीव बस देण्यात येतील असे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदी साठी पर्यायी व्यवस्था करून सुचानादेश काढण्यास प्रांत खेड यांनी सुचविले. आळंदी येथील नदीत पाणी कमी असल्याने यंत्रे पूर्वी नदीत पाणी येईल अशा पद्धतीने नदीत पाणी सोडण्याचे मागणी पत्राचा विचार न करता सोडण्याची व्यवस्था जलसंपदा विभागाने करावी असे त्यांनी सांगितले. कट्यारे म्हणाले, यात्रा काळात अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी दक्षता घेण्यात यावी. यात्रा काळात आळंदीकर नेहमी सहकार्य करीत असतात. त्याबद्दल आळंदीकरांचे कौतुक करीत सर्वानी यात्रा काळात प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *