माजी सरपंच योगेश पाटे व आमदार बेनके यांच्या बंधूमध्ये अस्तित्वाची लढाई

नारायणगाव :- (किरण वाजगे,कार्यकारी संपादक)

नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस

शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात येत्या पाच नोव्हेंबर रोजी २६ ग्रामपंचायतच्या निवडणुका व १५ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुका होणार आहेत. तालुक्यातील सर्वात लक्षवेधी व मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव ग्रामपंचायत च्या निवडणुकीकडे संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नारायणगावची निवडणूक ही खऱ्या अर्थाने चुरशीची होणार याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आमदार अतुल बेनके यांचे बंधू तथा जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका विधानसभा संघटक तथा अनेक युवकांचे प्रेरणास्थान असलेले माजी सरपंच योगेश पाटे यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
योगेश पाटे यांच्या श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून अनेक अनुभवी व प्रशासनाचा अभ्यास असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्याकडून उच्चशिक्षित उमेदवार डॉ शुभदा पंकज वाव्हळ या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. याशिवाय या पॅनलचे नेतृत्व स्वतः माजी सरपंच योगेश पाटे यांच्यासह विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, राष्ट्रवादी युवक चे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे, एडवोकेट राजेंद्र कोल्हे, अनिल दिवटे हे करत आहेत.
सरपंच पाटे यांच्या नेतृत्वाखाली गावातील अनेक सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे तसेच राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. गेली पाच वर्ष लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करत असताना अनेक समाजोपयोगी कामे केल्याचा दावा सरपंच पाटे यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके यांच्या मदतीने नारायणगावचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न पाटे यांनी केला आहे. मागील निवडणुकीत सलग २५ वर्ष सत्ता आपल्याकडे ठेवणारे चंद्रशेखर कोऱ्हाळे यांचा एक हाती पराभव करून पाटे यांनी अनेक विकासभिमुख कामे केली आहेत. त्यामध्ये गॅस शवदाहिनी, कचरा डेपो संरक्षण भिंत, सुमारे साडेबावीस कोटी रुपयांची जलजीवन योजना, गावातील अंतर्गत रस्ते, रस्त्याच्या कडे ला बसवलेले प्लेविंग ब्लॉक, बागबगिचा, श्री हरीस्वामी मंदिराजवळील आकर्षक घाट तसेच धोबीघाट, गावात अनेक ठिकाणी केलेले वृक्षारोपण, कोरोना काळात केलेले कार्य, तसेच आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे त्यांनी विजयाचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तरी आपल्या वडिलांचा म्हणजेच माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे यांचा समाजकार्याचा मिळालेला वारसा यामुळे या निवडणुकीमध्ये माजी सरपंच पाटे यांचे पारडे सध्या तरी जड वाटत असल्याचे पाटे यांचे समर्थक प्रचार करताना सांगत आहेत.
श्री मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून छाया रोहिदास केदारी या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते सुजित खैरे, माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बोरकर, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे, अमित बेनके, दिलीप कोल्हे, मकरंद पाटे हे नेतृत्व करत आहेत. परिवर्तन पॅनलच्या वतीने गेल्या पाच वर्षात काहीही भरीव कामे झाली नाही असे टीका करण्यात येत असून आम्हीच चांगले काम करून दाखवू असे सांगत मतदारांना आवाहन करण्यात येत आहे.
एकूणच अवघे चार दिवस निवडणुकीच्या प्रचाराला राहिले असताना सरपंच पाटे, संतोष नाना खैरे यांच्या श्री मुक्ताबाई हनुमान ग्राम विकास पॅनलच्या आधुनिक प्रचार यंत्रणेमुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे, प्रचारासाठी झटणारे अनेक युवक व युवती कार्यकर्ते यांच्यासह डिजिटल प्रचार यंत्रणा, याशिवाय आपण केलेली विकास कामे थेट जनतेच्या केवळ घरापर्यंतच नाही तर मनामनात बिंबवण्याचे काम पाटे यांच्या पॅनलच्या वतीने करण्यात येत आहे. याउलट परिवर्तन पॅनल ची प्रचारात असलेली विसंगती, अपुरी प्रचार यंत्रणा व जोमाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभाव यामुळे या निवडणुकीत आपलीच सरशी होणार असा दावा सरपंच पाटे, संतोष नाना खैरे, संतोष वाजगे, सुरज वाजगे यांनी केला आहे.

या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरुवातीला परिवर्तन पॅनलच्या प्रचार फलकावर दिसणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे हे परिवर्तन च्या वतीने प्रचार करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना प्रत्यक्षात निर्णय प्रक्रियेत न घेतल्यामुळे त्यांनी ऐनवेळी सरपंच योगेश पाटे यांच्या पॅनलला जाहीर पाठिंबा दिला. यामुळे श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल ची ताकद वाढली. सुरज वाजगे यांच्या या भूमिकेवर युवा नेते अमित बेनके यांनी वाजगे यांची मनधरणी करण्याऐवजी त्यांच्यावर जहरी टीका करत आमदार बेनके कुटुंबाचे दरवाजे तुमच्यासाठी बंद असल्याचे जाहीर रित्या सांगितले. यामुळेच सुरज वाजगे यांनी पूर्ण ताकदीनिशी संतोष नाना खैरे, संतोष वाजगे व योगेश पाटे यांच्या बरोबर प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. त्यामुळे देखील आपलाच विजय होईल असा दावा पाटे, खैरे, वाजगे यांच्या गोटातून करण्यात येत आहे.

दरम्यान प्रचाराच्या माध्यमातून कोपरासभा, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये होणाऱ्या बैठका, प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी याला श्री मुक्ताबाई ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोन्हीही पॅनलच्या वतीने विजयाचा दावा करताना पॅनल प्रमुख व कार्यकर्ते जरी दिसत असले तरी प्रत्यक्षात येत्या सहा नोव्हेंबर रोजी निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *