माध्यमिक शाळा गुणवत्ता स्तर निश्चितीत शिरूरची ‘विद्याधाम प्रशाला’ पुणे जिल्ह्यात प्रथम

रवींद्र खुडे, विभागीय संपादक 
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागामार्फत, पुणे जिल्हा तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळांची शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी गुणवत्ता स्तर निश्चिती करण्यात आली होती. या गुणवत्ता स्तर निश्चिती मुल्यांकनाचा निकाल नुकताच पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी घोषित केलेला असून, यात शिरुरच्या विद्याधाम प्रशालेने संपूर्ण पुणे जिल्हा तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याची माहिती प्रशालेचे प्राचार्य प्रकाश कल्याणकर यांनी दिली.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP 2020) शाळा मूल्यांकनाचा व गुणवता स्तर निश्चितीचा समावेश करण्यात आलेला असून त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. त्याच अनुषंगाने विविध निकषांवर आधारीत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पुणे जिल्हा परिषद तसेच पुणे व पिपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ७९९ अनुदानित माध्यमिक शाळांचे गुणवत्ता स्तर निश्चितीसाठी मूल्यांकन करण्यात आले. यात SSC व HSC परीक्षांचे निकाल, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) परीक्षा निकाल, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग व गुणवत्ता, सरकारी चित्रकला परीक्षेचा निकाल, इन्स्पायर ॲवार्ड, सहभाग, विज्ञान प्रदर्शन, विविध पातळीवरील कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये शाळांचा सहभाग व त्यांनी प्राप्त केलेले यश आदी निकष शाळांच्या मूल्यांकनासाठी निश्चित करण्यात आलेले होते.
वरील सर्व निकषांमध्ये सर्वाधिक ७६. २५% गुणांसह विद्याधाम प्रशालेने पुणे जिल्ह्यासह पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेस पूर्वीपासूनच गुणवत्तेची परंपरा असून विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी संस्था व शाळा प्रशासन शिक्षक व पालकांच्या सहकार्याने सतत प्रयत्नशील असते. ‘गर्जत ठेवू विद्याधाम’ या प्रशाला गौरव गिताप्रमाणे प्रशाला विविध शालेय, सहशालेय तसेच कला, क्रिडा, नाट्य, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत आलेली आहे. या यशासाठी प्रशालेचे सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे बहुमूल्य योगदान असल्याचे मत प्राचार्य प्रकाश कल्याणकर यांनी व्यक्त केले.
या दैदिप्यमान यशाबद्दल प्रशालेचे प्राचार्य, पर्यवेक्षक, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच पालकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव व माजी प्राचार्य नंदकुमार निकम तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *