शिरूर तालुक्यात बोगस कोव्हिड सेंटर चालविणारा दुसराही बोगस डॉक्टर सापडला…

शिक्रापूर/पुणे
बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील बोगस डॉक्टरचे प्रकरण ताजे असतानाच, शिक्रापूर मध्येही शुक्रवार दि. २३ एप्रिल २०२१ रोजी, आणखी एक बोगस डॉक्टर व बोगस कोव्हिड सेंटर आढळले आहे. शिरुरचे प्रांताधिकारी संतोशकुमार देशमुख यांनी आधार नावाच्या या बोगस दवाखान्यावर कारवाई करत, ते चालविणारा बंडगर नावाच्या व्यक्तीला शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हा गृहस्थ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने, या बोगस दवाखान्यामध्ये नेमकी कुणाची भागीदारी आहे, हे अद्याप त्याने कबूल केले नसून, शिक्रापूर पोलीस आता या बाबत शोध घेत आहेत. शिक्रापूर मध्ये कोविड सेंटरची परवानगी नसतानाही हे कोविड सेंटर चालु होते. स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या बंडगर याला, प्रांताधिकारी यांनी विचारणा केली असता, त्याने तो मार्केटिंगचा माणूस असल्याचे सांगितले. मात्र याठिकाणी कोरोना रुग्णांची वाताहत करत, रुग्णांच्या जीवाशी खेळत, त्यांची प्रचंड आर्थिक लूट चालू होती. प्रत्येक रुग्णाचे सुरुवातीला पन्नास हजार रुपये, रुग्ण दाखल करतानाच ऍडव्हान्स स्वरूपात घेतले जात होते. म्हणजेच पुढे या रुग्णांकडून लाखो रुपये बिल उकळत असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. शिक्रापूर जवळील बजरंगवाडी येथे, आधार या नावाने हे कोव्हिड केअर सेंटर सुरू होते.

दरम्यान, पुणे जी. प. सदस्या रेखा मंगलदास बांदल यांनीही येथे भेट दिली असता, त्यांनाही या बंडगर नावाच्या व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे देत, दुसऱ्याच व्यक्तींची नावे सांगितली होती.
या बंडगर नावाच्या व्यक्तीला शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर, या दवाखान्यातील सर्व रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया, व हा दवाखाना सील करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती, शिरुरचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिलीय.
एप्रिल महिन्यातील ही दुसरी बोगस डॉक्टर वरील व त्यांच्या हॉस्पिटल वरील कारवाई असल्याने, सर्वसामान्य  जनतेत मात्र संभ्रमावस्था असून, आजारी पडल्यावर आता लोकांनी अधिकृत दवाखाना आहे का नाही याचा शोध घेत बसायचे ? की आपल्या आजारी रुग्णाला दवाखान्यात ऍडमिट करायचे ? हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवाय, बोगस दवाखान्याच्या व बोगस डॉक्टरच्या नावाने रेमेडिसिवियर इंजेकशन घेतली जात असल्याचेही निष्पन्न झाल्याने, शिरुरचे विधिज्ञ व नोटरी रवींद्र खांडरे यांनी नुकतेच शासनाला एक पत्र देऊन विनंती केली आहे की, रेमेडिसिवियर चा हा जो काळा बाजार चालू आहे, तो थांबविण्यासाठी शासनाने ही औषधे प्रत्यक्ष रुग्णांच्याच नावाने द्यावीत, अशी मागणी केलीय.

परंतु शिरूर तालुक्यात असा हा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट कसा ? हा प्रश्न मात्र सर्वसामान्यांच्या मनात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *