बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. ०८/०९/२०२३.
शिक्षक दिनानिमित्त हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने बालाजी विश्व विद्यालयात सीताबाई थिटे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमोल शहा, बालाजी विश्व विद्यालयाचे प्राचार्य विनायक म्हसवडे, जिल्हा परिषडेच्या शिक्षिका व राष्ट्रीय खेळाडू अनिता हनुमंत भोगावडे, ग्रंथपाल व पत्रकार प्रताप भोईटे, जिल्हा परिषद शिक्षिका सीमा मिथिलेश आगरवाल, या पाच शिक्षकांचा प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, भारतीय राज्यघटनेची प्रत व पुष्प्गुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी माजी प्राचार्य डॉ. सदाशिव सोहोनी, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रणव दिलीप मुसळे, उपाध्यक्ष प्रसाद लांडे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, मंडळाचे माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, अशोक काळे, अविनाश जाधव, नचिकेत काळे, अशोक भोसले, सुनील चौधरी, मनसेचे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, प्रवीण मुथा, मुख्याध्यापिका स्वाती थोरात, क्रीडा शिक्षक नारायण काळे, दिलीप मुसळे, प्रमोद जोशी, राजेंद्र शहाणे, सुनील ओस्तवाल आदी उपस्थित होते.
गावडे यावेळी म्हणाले की, “शिरूर शहर हे एक आदर्श शहर असून विविध विधायक उपक्रम शहरात राबविले जातात. हीच परंपरा हलवाई चौक गणेश मित्र मंडळ पुढे चालवीत आहे. शिक्षकामुळे नवीन पिढी घडत असते, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षक कार्यरत असतात. समाजातील चांगल्या कामाच्या मागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे. समाजातील विविध प्रश्न समस्या, नवनवीन आव्हाने यावर मात करण्यासाठी शिक्षक कार्यरत असतात. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सर्वच क्षेत्रात मोठ्या झपाट्याने बदल होत असून शिक्षण क्षेत्रातही बदल होत आहेत. होणा-या या बदलानुसार बदल घडवावे लागतील.”
माजी प्राचार्य डॉ. सदाशिव सोहोनी म्हणाले की, “बदलते हवामान व निर्माण होत असलेले पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी वृक्ष संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यातील गुण हेरून त्याचे व्यक्तिमत्व घडवीत असतात. समाजाची उभारणी शिक्षक करीत असतात.”
अनिता भोगावडे यावेळी म्हणाल्या की, “कष्ट व जिद्द असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवू शकता. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ खेळावेत.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. सतीश धुमाळ यांनी सांगितले की, “सामाजिक व विधायक उपक्रमांचे आयोजन हलवाई चौक गणेश मित्रमंडळाच्या वतीने वर्षभर केले जात असते. काही वर्षापूर्वी गणेश विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून त्यातून वाचवीलेल्या पैशातून मंडळाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्याचबरोबर पर्यावरण संर्वधनासाठी वृक्षारोपण व झाडांचे वाटप, शालेय साहित्य वाटप, निराधारांना मदत, वाचन संस्कृती वाढीसाठी पुस्तकांचे वाटप असे विविध उपक्रम राबविले जातात.”
प्राचार्य डॉ. अमोल शहा, विनायक म्हसवडे, महिबूब सय्यद, संजय बारवकर यांनी ही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता पोंदे यांनी केले तर आभार प्रमोद जोशी यांनी मानले.