पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी न केल्यामुळे ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट ! – भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांची टीका

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२९ एप्रिल २०२२

पिंपरी


केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट मध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे , अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली.

पेट्रोल व डिझेल दरवाढीबाबत आमदार लांडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात पेट्रोल वर ३२ रु. १५ पैसे इतका व्हॅट आकारला जातो आहे. केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल वरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर भाजपा शासित राज्यांनी पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट तातडीने कमी केला. मात्र महाराष्ट्र , राजस्थान , पश्चिम बंगाल , केरळ , झारखंड , तेलंगणा , आंध्र प्रदेश या राज्यांनी पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट कमी केला नाही. राज्यांनीही आपल्या अखत्यारीतील करांचे ओझे कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा होती. पण, दारूवरील कर कमी करणाऱ्या ठाकरे सरकारने पंतप्रधानांचे आवाहन झुगारून राजकारण सुरूच ठेवले व त्याचा थेट फटका नागरिकांना बसला. गेल्या सहा महिन्यांत या करांपोटी राज्य सरकारने तब्बल साडेतीन हजार कोटींचा महसूल कमावला आहे.

मुख्यमंत्री राज्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत : लांडगे

महाराष्ट्राने राज्यांतर्गत कर कमी केल्यास पेट्रोल डिझेलचे भाव किमान दहा टक्क्यांनी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. पण ठाकरे सरकारची ती इच्छा नाही. केंद्र सरकारशी संघर्ष करण्याच्या ठाकरे सरकारच्या खुमखुमीमुळे नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

वास्तविक, जीएसटी परतावा आणि पेट्रोल-डिझेलवरील कर आकारणी या दोन्ही संपूर्ण स्वतंत्र बाबी आहेत. महाराष्ट्रातून जमा होणारा वस्तू व सेवा कराचा परतावा राज्याला सातत्याने व नियमितपणे मिळत असून मुख्यमंत्री म्हणतात ती थकबाकी नाही. ही रक्कम केंद्राकडून महाराष्ट्रास मिळण्याकरिता जुलै २०२२ पर्यंतचा अवधी असल्याने थकबाकी असल्याचा कांगावा करून उद्धव ठाकरे नागरिकांचीही दिशाभूल करत आहेत. मुळात थकबाकीची ही रक्कमदेखील २६ हजार कोटी एवढी नाही.  यापैकी १३ हजार ७८२ कोटींचा परतावा राज्य सरकारला अगोदरच मिळालेला असून उर्वरित १३ हजार ६२७ कोटी जुलैपर्यंत मिळणार आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेची दिशाभूल न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *