कुराण शरीफ फाडल्याच्या निषेधार्थ नारायणगावात मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

नारायणगाव :- (किरण वाजगे,कार्यकारी संपादक)
कोळगावथडी ता. कोपरगांव जि. नगर येथे एका इसमाने मुस्लिम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफ फाडल्याच्या निषेधार्थ नारायणगाव येथे मुस्लिम समाजाने एकत्रित येऊन या घटनेचा निषेध केला आहे.
नारायणगाव पोलीस स्टेशनला संबंधित इसमावर कडक कारवाई करण्यात यावी या अशा आशयाचे निवेदन नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना दिले.
यावेळी मोठ्या संख्येने नारायणगाव शहरातील मुस्लिम बांधव तसेच मस्जिद मधील इमाम उपस्थित होते.
या धर्मांध व्यक्तीने केलेल्या कृतीमुळे इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफ यांची विटंबना होऊन
संपूर्ण जगातील मुस्लिम समाजाच्या भावनांना ठेच पोहचली आहे. आपल्या भारत देशात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, एकत्र सण साजरे करतात अशा परिस्थितीत संबंधित इसमाने धार्मिक तेढ निर्माण व्हावेत या उद्देशाने ही कृती केल्याचे दिसून येते त्यामुळे अशा व्यक्तीवर कायदेशीर कठोर कारवाई करावी व सर्व धर्मांमध्ये जातीय सलोखा कायम राहील असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी निवेदन स्वीकारताना नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यात येतील असे सांगितले. नारायणगाव या ठिकाणी हिंदू मुस्लिम यांच्यातील जातीय सलोखा कायम आहे व तो तसाच अबाधित ठेवावा दुसरीकडे घटलेल्या घटनेमुळे स्थानिक पातळीवर कुठलेही अनुचित प्रकार करू नका अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करू नका. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा. जर कोणी व्यक्ती जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.असेही शेलार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *